लेख – ‘यूएई’चा निर्णय आणि भारताला लाभ

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> राजू वेर्णेकर

एकेकाळी जगातील अर्ध्या तेल निर्यातीवर नियंत्रण करणाऱ्या ‘ओपेक’ची क्षमता गेल्या काही वर्षांत 40 टक्क्यांपर्यंत खाली आली होती. आता यूएईने ‘ओपेक’ सोडल्यामुळे क्षमता 30 टक्क्यांपर्यंत खाली येण्याची शक्यता आहे. यूएईपाठोपाठ इतर तेल उत्पादक देशांनी स्वतंत्र धोरण स्वीकारून तेही बाहेर पडल्यास ‘ओपेक’ची सामूहिक शक्ती कमी होऊ शकते.

तेल उत्पादकांची संघटना ‘ओपेक’ (ऑर्गनायझेशन ऑफ दी पेट्रोलियम एक्स्पोर्टिंग कंट्रीज) मधून बाहेर पडण्याचा निर्णय संयुक्त अरब अमिराती (यूएई) ने घेतला आहे. अर्थात जागतिक अर्थव्यवस्था आणि तेल राजकारणात हा निर्णय एक नवे वळण ठरणार आहे. अर्थात यूएई व भारताचे सलोख्याचे संबंध पाहता यात भारताला फायदा होण्याची शक्यता जास्त आहे.

जगात क्रूड ऑईल आयात करणाऱ्या देशांत भारताचा तिसरा नंबर लागतो आणि ऊर्जा निर्मितीसाठी जवळ जवळ 88 टक्के क्रूड ऑईल आयात केले जाते. सध्या यूएईमध्ये प्रतिदिन 2.92 ते 3.1 दशलक्ष बॅरल्स तेलाची निर्मिती होते. हे उत्पादन पुढच्या वर्षीपर्यंत 5 दशलक्षापर्यंत वाढवायचे यूएईचे उद्दिष्ट आहे. यूएईने आपल्या तेल उत्पादनात प्रचंड गुंतवणूक केली आहे. याचबरोबर सौदी अरेबियामध्ये प्रतिदिन 9.48 दशलक्ष, इराकमध्ये 3.77 दशलक्ष आणि इराणमध्ये 3.26 दशलक्ष बॅरल्स तेलाची निर्मिती होते.

यूएई हा भारताचा मोठा व्यापारी भागीदार आहे. आता ‘ओपेक’मधून बाहेर पडून यूएईने स्वतंत्रपणे उत्पादन वाढवले आणि परिणामी जागतिक स्तरावर तेलाचे दर खाली आले, तर भारतासाठी ती आनंदाची बातमी असेल. कारण भारताला ‘ओपेक’च्या अटींवर विसंबून न राहता थेट यूएईकडून अधिक सवलतीच्या दरात तेल मिळवता येईल.

अबू धाबी (राजधानी), दुबई, शारजाह, अजमान, उम्मअल कुवैन, फुजैराह आणि रास अल खैमाह या अमिराती यूएईमध्ये मोडतात. ओपेक ही संघटना जगातील प्रमुख तेल उत्पादक देशांना एकत्र आणून उत्पादन नियंत्रणाद्वारे जागतिक बाजारातील तेलाचे दर स्थिर ठेवण्याचा प्रयत्न करते. याआधी सौदी अरेबिया, इराक, इराण यांसारख्या देशांसोबत यूएई हा ‘ओपेक’चा महत्त्वाचा सदस्य होता. यूएईकडे मोठय़ा प्रमाणावर तेलसाठे असून 59 वर्षांनंतर ‘ओपेक’मधून ‘यूएई’ बाहेर पडणे ही जागतिक ऊर्जा क्षेत्रातील एक महत्त्वाची घटना ठरू शकते.

अंगोला, कतार, इंडोनेशिया, इक्वेडोर या देशांनंतर यूएईने ‘ओपेक’चे सदस्यत्व सोडल्यामुळे ‘ओपेक’मध्ये एकूण 11 सदस्य देश राहिले आहेत. त्यात अल्जीरिया, काँगो, इक्वेटोरियल गिनी, गॅबॉन, इराण, इराक, कुवेत, लिबिया, नायजेरिया, सौदी अरेबिया, व्हेनेझुएला यांचा समावेश आहे.

‘ओपेक’चे निर्बंध

‘ओपेक’ने सदस्य देशांवर लावलेल्या उत्पादन मर्यादा हे नाराजीचे मुख्य कारण आहे. या शिवाय ‘ओपेक’वर सौदी अरेबियाचा वरचष्मादेखील यूएईला खटकत होता. ‘ओपेक’मध्ये सौदी अरेबियाचा शब्द अंतिम मानला गेल्यामुळे सौदीच्या दबावाखाली उत्पादन कपात केली जात होती, जी यूएईला मान्य नव्हती. ‘ओपेक’च्या कोटा पद्धतीमुळे उत्पादनावर मर्यादा आल्या पूर्ण क्षमतेनुसार उत्पादन न झाल्यामुळे ‘यूएई’चे आर्थिक नुकसान होत होते.

येमेन युद्ध, लाल समुद्रावर नियंत्रण अशा मुद्दय़ावरून गेल्या काही वर्षांत सौदी अरेबिया आणि यूएई यांच्यात स्पर्धा वाढली आहे. यूएईचे अमेरिका आणि इतर पाश्चिमात्य देशांशी चांगले संबंध आहेत. म्हणून मध्यपूर्वेत स्वतःचे स्वतंत्र स्थान निर्माण करण्यासाठी यूएईने सौदी अरेबियाच्या छायेतून बाहेर पडण्याचे ठरवले आहे. सौदी अरेबिया आपल्या अर्थव्यवस्थेत 2030 पर्यंत आमूलाग्र बदल करण्याच्या प्रयत्नात असून इतर देशांच्या तेल उत्पादनावर नियंत्रण ठेवण्याचा पुरेपूर प्रयत्न करीत आहे.

सध्या अबू धाबी नॅशनल ऑइल कंपनीने (ADNOC) तेल उत्पादन वाढवण्यासाठी 150 अब्ज डॉलर्सचा प्रकल्प राबवला आहे. म्हणून ही गुंतवणूक उपयुक्त ठरवण्यासाठी यूएईला जास्तीत जास्त तेल विकणे गरजेचे आहे, जे ‘ओपेक’मध्ये राहून शक्य नव्हते.

यूएईला स्वतःच्या आर्थिक धोरणांनुसार तेल उत्पादन वाढवायचे आहे. याचबरोबर केवळ तेलावर अवलंबून राहण्याऐवजी पर्यटन, वित्त, तंत्रज्ञान आणि ऊर्जेच्या नवीन स्रोतांकडे यूएईचा कल आहे. याचबरोबर ऊर्जा धोरणात स्वायत्तता मिळवणे यूएईला लाभदायी वाटते.

मध्यपूर्वेतील इस्रायल-इराण संघर्ष हा जागतिक तेल बाजारासाठी महत्त्वाचा घटक आहे. इराणने ‘यूएई’सह अमेरिकन लष्करी तळे असलेल्या देशांवर हल्ले केले यात ‘यूएईचे’ही बरेच नुकसान झाले. मात्र त्यांना कुणाचीही मदत मिळाली नाही. मग ‘ओपेक’ कशासाठी आहे? असा प्रश्न यूएईने उपस्थित केला आहे.

तेल पुरवठय़ात वाढ

‘यूएई’ स्वतंत्रपणे उत्पादन वाढवू लागल्यास बाजारात तेल पुरवठा वाढून इतर उत्पादक देशांमध्ये तीव्र स्पर्धा होऊ शकते. तेलाच्या दरातील चढ-उतारांचा थेट परिणाम महागाई, वाहतूक खर्च आणि औद्योगिक उत्पादनावर होतो. त्यामुळे हा निर्णय जागतिक आर्थिक स्थैर्यावर प्रभाव टाकू शकतो. दुसरीकडे जागतिक बाजारात स्पर्धा वाढून तेलाचे दर कमी होण्याची शक्यता निर्माण होऊ शकते.

सुरुवातीपासून ‘ओपेक’च्या तेल नियंत्रणाबाबत नाराजी व्यक्त करणाऱ्या अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ‘ओपेक’मधून बाहेर पडण्याच्या ‘यूएई’च्या निर्णयाचे स्वागत केले आहे. अर्थात पण सध्या सुरू असलेले अमेरिका-इस्रायल, इराण युद्ध शांत होऊन होर्मुज सामुद्रधुनीमधील तणाव कमी झाल्यानंतरच तेल बाजारातील परिस्थिती बदलेल.