गेट वे ऑफ इंडिया बघायला आला अन् भरकटला; अल्पवयीन मुलाला कुलाबा पोलिसांचा मदतीचा हात

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

बोरिवलीतील 11 वर्षांचा मुलगा घरी काहीही न सांगता गेट वे ऑफ इंडिया बघायला एकटाच निघाला. पण तेथून परतताना रस्ता भरकटला. सुदैवाने कुलाबा पोलिसांच्या नजरेस पडला आणि त्याची सुखरूप घरवापसी झाली.

गेट वे ऑफ इंडिया येथील चौकीतील पोलिस गस्त घालत असताना त्यांना एक मुलगा एकटाच मिळून आला. मग त्याला ताब्यात घेऊन वरिष्ठ निरीक्षक सुधाकर देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक अरुणा सानप यांनी मुलाकडे चौकशी सुरू केली. तेव्हा तो बहिणीसोबत गेट वे ऑफ इंडिया बघायला आल्याचे सांगून लागला. आमची फाटाफुट झाल्याचे तो सांगू लागला. त्याच्या बोलण्यात विसंगती वाटू लागल्याने सानप यांनी त्याला विश्वासात घेत कौशल्याने विचारण्यास सुरुवात केली. केवळ बोरिवली आणि जांभळी गल्ली एवढंच सांगत होता. मग सानप व त्यांच्या पथकाने गुगल मॅपच्या त्या परिसरात चौकशी करून त्या मुलाच्या आईला शोधून काढले.

खोटं बोलला पण…

मी बहिणीसोबत इथे आलो होतो असं तो मुलगा खोटं बोलला होता. पण सानप यांनी त्याला प्रेमाने विश्वासात घेऊन बोलतं केल्यावर तो एकटाच तिथे आल्याचे निष्पन्न झाले. याआधी बहिणीसोबत तो आला होता. मात्र यावेळी एकटाच बोरिवलीहून गेट वेला आला होता.