
वैद्यकीय प्रवेश परीक्षेमधील (नीट) घोटाळा आणि पेपरफुटीच्या मुद्द्यावरून लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्र सरकारवर सडकून टीका केली आहे. देशातील 22 लाख विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी खेळ सुरू असतानाही पंतप्रधान मोदी यावर गप्प का आहेत? असा संतप्त सवाल राहुल गांधी यांनी एक व्हिडीओ शेअर करत उपस्थित केला. तसेच केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांना तातडीने पदावरून हटवण्याची किंवा पंतप्रधानांनी स्वतः याची जबाबदारी घेण्याची मागणी त्यांनी केली आहे.
नीट परीक्षेसाठी देशातील 22 लाख विद्यार्थ्यांनी दिवस-रात्र एक करून मेहनत केली होती. मात्र, त्यांची ही संपूर्ण मेहनत वाया गेली आहे. परीक्षा सुरू होण्याच्या दोन दिवस आधीच ‘नीट’चा पेपर व्हॉट्सॲपवर विकला जात होता, ही गोष्ट आता संपूर्ण देशाला ठाऊक झाली आहे, असे राहुल गांधी म्हणाले. यावेळी राहुल गांधी यांनी शिक्षण व्यवस्थेवर टीका करताना राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भाजपवरही हल्ला चढवला.
देशातील शिक्षण व्यवस्थेचा पायाच मोडीत काढण्यात आला असून आरएसएस-भाजपच्या लोकांमुळे शैक्षणिक संस्थांमध्ये भ्रष्टाचार बोकाळला आहे. आज विद्यापीठांमध्ये कुलगुरू आणि प्राध्यापकांची नियुक्ती गुणवत्तेवर नाही, तर ते आरएसएस विचारसरणीचे आहेत की नाही यावर केली जाते. केवळ विचारधारा जुळत असल्यामुळे अकार्यक्षम लोकांना मोठ्या पदांवर बसवले जात आहे, असा आरोप राहुल गांधी यांनी केला.
पंतप्रधानांनी धर्मेंद्र प्रधान यांची तत्काळ हकालपट्टी करावी, राहुल गांधींची मागणी; RSS-BJP च्या लोकांमुळे शैक्षणिक संस्थांमध्ये भ्रष्टाचार बोकाळला
वाचा सविस्तर – https://t.co/bWlGAlv22w pic.twitter.com/pMEDBldTJZ— Saamana Online (@SaamanaOnline) May 16, 2026
गेल्या काही वर्षांत देशात तब्बल 80 वेळा विविध परीक्षांचे पेपर लीक झाले आहेत. यामुळे जवळपास 2 कोटी तरुणांचे भविष्य अंधारात ढकलले गेले आहे. या संपूर्ण रॅकेटमागे पैसा कमावण्याचा एक मोठा नेक्सस कार्यरत आहे, असा आरोप राहुल गांधी यांनी केला.
एवढा मोठा घोटाळा होऊनही पंतप्रधान मोदी एक शब्दही बोलायला तयार नाहीत. मोदीजी, धर्मेंद्र प्रधान यांना आत्ताच्या आत्ता पदावरून हटवा किंवा या सर्व प्रकरणाची जबाबदारी स्वतः स्वीकारा. तसेच या पेपरफुटीमागे असलेल्या मुख्य आरोपींना अटक करून तात्काळ तुरुंगात डांबण्यात यावे, अशी मागणीही राहुल गांधी यांनी केली आहे.




























































