धारावीत अशोक मिल कंपाऊंड परिसरात आग, अनेक दुकाने जळून खाक

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

धारावीतील अशोक मिल कंपाऊंड परिसरात रविवारी रात्री 11 वाजण्याच्या सुमारास तळ अधिक तीन मजली इमारतीत आग लागल्याची घटना घडली. काही वेळात आग वाऱ्यासारखी पसरली आणि परिसरात धुराचे लोट पसरले. अग्निशमन दलाच्या जवानांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत आगीवर रात्री 3 वाजण्याच्या सुमारास नियंत्रण मिळवले. दरम्यान, या घटनेत कोणीही जखमी झाले नसल्याची माहिती मुंबई महापालिका प्रशासनाकडून देण्यात आली.

धारावी अशोक मिल कंपाऊंड, 90 फिट रोड, लक्ष्मी मेडिकल स्टोअर्स येथे तळ अधिक तीन मजली इमारत आहे. या ठिकाणी रविवारी रात्री 11 वाजण्याच्या सुमारास एका गाळ्यात शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याची घटना घडली. काही वेळात आग वाऱ्यासारखी पसरली. त्यामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. विद्युत वायरिंग, रेडिमेड कपडय़ांचे कच्चे साहित्य, गारमेंट मशिनरी, लाकडी फर्निचर, टेबल-खुर्च्या या घटनेत जळून खाक झाले. घटनास्थळी अग्निशमन दलाच्या अनेक गाड्या दाखल झाल्यानंतर युद्धपातळीवर आग विझवण्याचे काम सुरू करण्यात आले. अग्निशमन दलाने पहाटे 3 वाजण्याच्या सुमारास आगीवर नियंत्रण मिळवले. या घटनेचा पुढील तपास अग्निशमन दलाचे अधिकारी स्थानिक पालिकेचे अधिकारी व स्थानिक पोलीस करत आहेत.