
>> अरुण
महाराष्ट्रापासून केरळपर्यंत पसरलेला सह्यगिरीचा पट्टा म्हणजेच पश्चिम घाट प्रदेश. हा संपूर्ण भाग अतिमहत्त्वाचा आणि कितीतरी जागतिक दुर्मिळतेच्या कक्षेत येणाऱ्या वन्य सजीवांनी समृद्ध झालेला आहे. यातील अनेक मोठे प्राणी-पक्षी, सरपटणारे जीव (सरिसृप) महत्त्वाचे आहेतच, परंतु दुर्मिळ कीटकांचाही हा अधिवास असून आता बदलत्या हवामानाच्या तडाख्याने त्यापैकी अनेक कीटकांचं जीवन धोक्यात आलं आहे.
माणसासारखे ‘चतुर’, बुद्धिमान प्राणी सभोवतालचं वातावरण आपल्याला अनुकूल करू शकतात. इतर प्राण्यांना ते जमत नाही. ‘रांधा-वाढा’ वगैरे गोष्टी कोणा प्राण्याच्या गुहेत किंवा घरटय़ात नसतात. एका नैसर्गिक ऊर्मीने त्यांचं सर्व जीवन सुरळीत चालत असतं. पक्षी कुशलतेने घरटी बांधतात ही एक मोठीच गोष्ट. मधमाशीही सुबक पोळं साकारतेच, परंतु त्यात किंवा मुंग्यांच्या वारूळात लक्षावधी वर्षांत कोणताच बदल झालेला दिसत नाही. म्हणूनच माणूस वगळता इतर सर्व सजीव निसर्गाशी जुळवून घेऊन जगतात.
जोपर्यंत त्यांना बाहय़ धक्का बसत नाही तोपर्यंत त्यांचं जग अबाधित असतं. त्यामध्ये नैसर्गिक आपत्ती हा भाग असतोच. मात्र अनेक प्रजातींना त्याचा सुगावा त्याच नैसर्गिक ऊर्मीमुळे आधी लागतो. लक्षावधी वर्षांत अशा आपत्तींना सामोरं जाण्याची त्यांची तयारी असते. मात्र गेल्या दोन शतकांत त्यांना अकल्पित अशा मानवनिर्मित वातावरण बदलला तोंड द्यावं लागतंय. सर्व प्रकारच्या प्रदूषणाने सूक्ष्म कीटकांचं जीवनच धोक्यात आलंय. चतुर किंवा ड्रगनफ्लाय आणि डॅमसेलफ्लाय या ‘चतुर’ प्रजातीमधल्या जीवांची पश्चिम घाटांमधली संख्या गेल्या काही (2 ते 3) वर्षांत 35 टक्क्यांनी घटल्याचं वन्य अभ्यासकांच्या लक्षात आलंय. सुमारे 144 ठिकाणी केलेल्या चतुरस्र सर्वेक्षणातून हा चतुरसंहार ध्यानात आलाय तो भयावह आहे.
नुसतं ‘प्लॅन्टेशन’ किंवा वृक्षारोपण आणि वर्षानुवर्षे निसर्गाने निर्माण केलेलं जंगल यातला फरक भल्याभल्यांच्या लक्षात येत नाही. जंगल परिपूर्ण असतं. त्यातील जैविक वैविध्य परस्पर सहचर्याने वाढत असतं. ते कृत्रिमरीत्या निर्माण करता येत नाही. चतुर किंवा डेमसेलफ्लाय हे नाजूक चतुर वेगाने नष्ट होत असतील तर फळाफुलांच्या परागीभवनावरही त्याचे विपरीत परिणाम होणार. पक्ष्यांचं खाद्य वांध्यात येणार… अशी ही नष्टचर्याची साखळी तोडणं गरजेचं आहे. ते माणूसच करू शकतो.





























































