
कल्पेश गोविंद कोळी स्मृती क्रिकेट स्पर्धेच्या अंतिम फेरीत चर्चगेट केंद्राने दमदार खेळ करत चषकावर आपले नाव कोरले. चर्चगेटच्या संघाने ठाण्याच्या संघाचा पहिला डाव 138 धावांमध्ये रोखला होता. या धावसंख्येचा पाठलाग करताना चर्चगेटच्या संघाने 7 बाद 370 असा धावांचा डोंगर उभारला. त्यामुळे पहिल्या डावाच्या आघाडीच्या जोरावर चर्चगेट संघाने जेतेपद पटकावले. यावेळी ‘सामनावीर’ हा पुरस्कार आरुष कोल्हेने पटकावला, तर शार्दुल फागरे हा ‘सर्वोत्तम फलंदाज’, तर ‘सर्वोत्तम गोलंदाजा’चा मानकरी राजवीर लाड ठरला.
एलआयसी-कल्पेश गोविंद कोळी स्मृती क्रिकेट स्पर्धेच्या अंतिम सामन्यात आरुष कोल्हेने केलेली 163 धावांची शानदार खेळी चर्चगेट केंद्राच्या विजयात महत्त्वपूर्ण ठरली. प्रथम फलंदाजी करताना ठाणे केंद्राचा पहिला डाव पहिल्या दिवशी 138 धावांत आटोपला. प्रत्युत्तरादाखल चर्चगेट केंद्राने दुसऱ्या दिवशी शनिवारी 124 षटकांत 7 बाद 370 धावा उभारल्या. चर्चगेट केंद्राच्या विजयात आरुष कोल्हेबरोबरच निखिल गुरव (77) आणि शार्दुल फागरे (68) यांनीही महत्त्वपूर्ण योगदान दिले. हिंदुस्थानचा माजी क्रिकेटपटू वासिम जाफर याच्या हस्ते विजेत्यांना गौरवण्यात आले. विशेष म्हणजे, 1991 मध्ये कल्पेश गोविंद कोळी स्मृती क्रिकेट स्पर्धेत वासिम जाफर हा खेळाडू म्हणून सहभागी झाला होता. पारितोषिक वितरण सोहळ्याप्रसंगी मुंबई क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष अजिंक्य नाईक, सचिव उन्मेष खानविलकर तसेच एलआयसीचे प्रादेशिक व्यवस्थापक आय. प्रभाकरन उपस्थित होते.
स्पर्धेतील वैयक्तिक पुरस्कारांचे मानकरी ः
अंतिम लढतीमधील सामनावीर ः आरुष कोल्हे (चर्चगेट केंद्र) सर्वोत्तम फलंदाज ः शार्दुल फागरे (चर्चगेट केंद्र) सर्वोत्तम गोलंदाज ः राजवीर लाड (एमसीए अकादमी केंद्र) सर्वोत्तम यष्टिरक्षक ः तन्मय मालुसरे (ठाणे केंद्र) उदयोन्मुख वेगवान गोलंदाज ः आरव सेठी (वाशी केंद्र) उदयोन्मुख खेळाडू ः जय म्हात्रे (चर्चगेट केंद्र) उदयोन्मुख फलंदाज ः शार्दुल फागरे (चर्चगेट केंद्र) हॅटट्रिक हीरो ः श्लोक यादव (घाटकोपर केंद्र) स्पर्धेतील सर्वोत्तम खेळाडू ः आरुष कोल्हे (चर्चगेट केंद्र).




























































