
पुसद येथील सह दुय्यम निबंधक कार्यालयात दस्तलेखकांच्या हस्तकांमध्ये झालेल्या मारामारी आणि महिलांसमोर झालेल्या अश्लील शिवीगाळीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने खळबळ उडाली आहे. 2 जून रोजी व्यवहारांच्या क्रमांकावरून सुरू झालेला वाद काही वेळातच हाणामारीपर्यंत पोहोचला.
यावेळी कागदपत्रांची फेकाफेक करण्यात आल्याचा आरोप असून महिलांसमोर अश्लील भाषेचा वापर झाल्याने नागरिकांनी तीव्र संताप व्यक्त केला. या घटनेचे चित्रीकरण माहिती अधिकार कार्यकर्ते तथा सेवानिवृत्त कार्यकारी अभियंता सुधाकर चापके यांनी केल्याचे सांगितले जात आहे. महिलांसमोर अश्लील शिवीगाळ आणि मारामारी झाल्यानंतर उपस्थित महिलांनी सह दुय्यम निबंधक विद्या तळेगावकर यांच्याकडे धाव घेत संताप व्यक्त केला. मात्र, प्रशासनाने तत्काळ हस्तक्षेप न केल्याने “कार्यालयात नेमके चाललेय तरी काय?” असा सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.
घटनेनंतरही संबंधितांवर कारवाई न झाल्याने प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. दरम्यान, कार्यालयातील कथित दलालशाही, हस्तकांचा वाढता हस्तक्षेप आणि बेशिस्त कारभार पुन्हा एकदा चर्चेत आला असून सीसीटीव्ही फुटेज तपासून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.





























































