
आयटी क्षेत्रात गेल्या काही महिन्यांपासून प्रचंड नोकर कपात झाली आहे. एआयचा फटका आयटी कंपन्यांमधील कर्मचाऱ्यांना बसत आहे. कंपन्या बेमालूमपणे कर्मचाऱ्यांना घरी बसवत आहेत. आता त्यात गुगलसारख्या दिग्गज आयटी कंपनीचीही भर पडली आहे. गुगलने क्लाऊड विभागातील अनेक कर्मचाऱ्यांना कामावरून काढले आहे. या कर्मचाऱ्यांमध्ये जगभरातील हॅकिंगवर संशोधन करणाऱ्या गुगल थ्रेट इंटेलिजन्स ग्रुपचादेखील समावेश आहे. धक्कादायक बाब म्हणजे, या वर्षात आतापर्यंत १६४ कंपन्यांनी १ लाख १६ हजार ३७९ कर्मचाऱ्यांना कामावरून काढले आहे. जगभरातील आयटी क्षेत्र या नोकर कपातीच्या भूकंपामुळे हादरले आहे.
गुगलने नेमके किती कर्मचाऱ्यांना कामावरून काढले, याचा आकडा जाहीर केलेला नाही. ही कर्मचारी कपात गुपचूप झालेली आहे. गुगलच्या एका कर्मचाऱ्याने ‘लिंक्डइन’वर एक पोस्ट टाकून नोकर कपातीबाबत माहिती दिली. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, एआयसारख्या क्षेत्रात गुंतवणूक करण्याच्या दृष्टीने हा निर्णय घेण्यात आला आहे. ग्राहक आणि व्यवसायाच्या बदलत्या गरजा पूर्ण करण्यासाठी आम्ही नियमित अंतर्गत मूल्यांकन करून बदल करतो, असे कंपनीने म्हटले आहे. मात्र कर्मचारी कपातीची जाहीर माहिती देणाऱ्या कंपन्यांमध्ये गुपचूप नोकर कपात करण्यात येत आहे. आयटी क्षेत्रासाठी हा फार मोठा धक्का आहे.
आठवडाभरात तिसरी नोकर कपात
जून महिन्याच्या जेमतेम ५ दिवसांमध्ये नोकर कपातीची ही तिसरी बातमी आहे. यापूर्वी उबेरने २३ टक्के नोकऱ्या कमी करत असल्याचे जाहीर केले होते. याशिवाय सॅन फ्रान्सिस्को स्थित गिटलॅब या टेक कंपनीने सुमारे ३५० पूर्णवेळ नोकऱ्या कमी करत असल्याचे सांगितले.
१६४ कंपन्यांमध्ये मोठी नोकर कपात
या वर्षी तब्बल १६४ कंपन्यांनी १.१६ लाख कर्मचाऱ्यांना कामावरून काढले आहे. त्यात ओरॅकल, टीसीएस, मायक्रोसॉफ्ट, अॅमेझॉन, मेटा यांसारख्या दिग्गज कंपन्यांचा समावेश आहे. एआयचा वापर वाढत आहे. त्यामुळे कंपन्या या क्षेत्रात गुंतवणूक वाढवण्यावर भर देत आहेत. सॉफ्टवेअर आणि क्लाऊड व्यवसाय पारंपरिक सपोर्ट किंवा मेंटेनन्स टीम्सकडून बजेट दुसरीकडे वळवण्यात येत आहे.





























































