
IPL 2026 मध्ये वैभव सूर्यवंशीचा रुद्रावतार साऱ्या देशाने नव्हे तर जगाने पाहिला. जगभरातल्या दिग्गजांनी त्यांच्या खेळाचं कौतुक केलं. आता पुन्हा एकदा या 15 वर्षांच्या पोराने एक ऐतिहासिक कामगिरी करत क्रिकेटचा देव सचिन तेंडुलकर यांचा विक्रम मोडित काढला आहे. आज (06 जून 2026) निवड समितीने आयर्लंड आणि इंग्लंडमध्ये खेळल्या जाणाऱ्या टी20 मालिकेसाठी टीम इंडियाची घोषणा केली. या संघात वैभव सूर्यवंशीचा सुद्धा समावेश करण्यात आला आहे. या निवडीसह वैभव सूर्यवंशी आता टीम इंडियामध्ये निवड होणारा सर्वात कमी वयाचा फलंदाज बनला आहे. यापूर्वी हा विक्रम सचिन तेंडुलकर यांच्या नावावर होता.
सचिन तेंडुलकर यांची 1989 साली पहिल्यांदा पाकिस्तान दौऱ्यासाठी टीम इंडियामध्ये निवड झाली होती. तेव्हा त्यांचं वय 16 वर्ष आणि 205 दिवस इतकं होतं. पण वैभव सूर्यवंशीने हा सर्वात महत्त्वाचा टप्पा वयाच्या अवघ्या 15 व्या वर्षी पार केला आहे. जवळपास 36 वर्ष या विक्रमावर सचिन तेंडुलकर यांचं नाव होतं. पण आता वैभव सूर्यवंशीने हा विक्रम आपल्या नावे करत हिदुस्थानी क्रिकेटमध्ये इतिहास रचला आहे. यामुळे वैभव सूर्यवंशीच्या चाहत्यांमध्ये उत्साहाचे वातावरण असून सचिन तेंडुलकरचा आणखी एक विक्रम वैभव सूर्यवंशीच्या रडारवर असून तो विक्रमही वैभव मोडित काढेल, अशी चाहत्यांना अपेक्षा आहे.
वैभव सूर्यवंशीची टीम इंडियामध्ये निवड झाल्याने सचिन तेंडुलकर यांचा एक विक्रम तर मोडित निघालाच. पण जर वैभव सूर्यंवशीला 26 जून रोजी आयर्लंडविरुद्ध मैदानात उतरवंल तर वैभव सूर्यवंशी 15 वर्ष आणि 71 व्या दिवशी देशासाठी खेळणारा सर्वात कमी वयाचा पहिला खेळाडू ठरेल. हा विक्रमही सचिन तेंडुलकर यांच्या नावावर आहे. 18 डिसेंबर 1989 साली वयाच्या 16 व्या वर्षी आणि 238 व्या दिवशी सचिन तेंडुलकर पाकिस्तानविरुद्ध पहिल्यांदा मैदानात उतरले होते. यासह सर्वात कमी वयाचा शतक ठोकणारा फलंदाज होण्याची संधी सुद्धा वैभव सूर्यवंशीला आहे. हा विक्रम सुद्धा सचिन तेंडुलकर यांच्या नावावर आहे.
इंग्लंड, आयर्लंड टी-20 मालिकेसाठी हिंदुस्थानचा संघ –
श्रेयस अय्यर (कर्णधार), तिलक वर्मा (उपकर्णधार), अभिषेक शर्मा, संजू सॅमसन, इशान किशन, शिवम दुबे, नितीश कुमार रेड्डी, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, वरूण चक्रवर्ती, रवी बिश्नोई, मोहम्मद सिराज, हर्षित राणा, अर्शदीप सिंग, प्रिन्स यादव, वैभव सूर्यवंशी

























































