
अमेरिकेचा रोजगाराबाबतचा अहवाल शुक्रवारी जाहीर झाल्यानंतर त्याचे परिणाम जागतिक अर्थव्यवस्था, शेअर बाजाराप्रमाणेच वायदेबाजारातही झाले आहे. अमेरिकेत रोजगाराचे प्रमाण वाढल्याचा अहवाल आल्यानंतर डॉलर मजबूत झाला. त्यामुळे वायदेबाजारात सोन्याचांदीच्या दरात शुक्रवारी मोठी घसरण झाली. घसरणीचे हे सत्र सोमवारीही सुरुच आहे. तसेच इस्रयाल इराणमधील वाढत्या संघर्षामुळे कच्च्या तेलाचे दर पुन्हा वाढल्याने सोनेचांदीतील घसरण आणखी तीव्र झाली आहे.
सोने आणि चांदीच्या दरात सोमवारी मोठी घसरण झाली आहे. सोन्याचा भाव प्रति १० ग्रॅम ३,४२२ रुपयांनी घसरला आहे. दरम्यान, चांदीचा भाव १३,००० रुपयांपेक्षा जास्त घसरल्याने चांदीचा भाव अडीच लाख रुपयांच्या खाली आला आहे. शुक्रवारच्या तुलनेत सोमवारी सोने आणि चांदीच्या दरात मोठी घसरण झाली आहे.
वायदे बाजारात ४ वाजण्यास सुमारास सोन्याचे दरात 1799 रुपयांचे घसरण होत ते 1,53795 वर व्यवहार करत होते. तर चांदीत 5337 रुपयांची घसरण होत ते 243273 रुपयांवर व्यवहार करत होते. सोमवारी सकाळी २४-कॅरेट सोन्याचा दर प्रति १० ग्रॅम १५०,७६८ आहे. यापूर्वी, शुक्रवारी दुपारी हा भाव प्रति १० ग्रॅम १५४,१९० होता. म्हणजेच सोन्याच्या दरात ३,४२२ ची घसरण झाली आहे. सोन्याप्रमाणेच चांदीच्या दरात लक्षणीय घसरण झाली आहे. १ किलो चांदीचा भाव २४१,१६० पर्यंत घसरला आहे. यापूर्वी शुक्रवारी चांदीचा भाव २५४,९५० प्रति किलो होता. तेव्हापासून चांदीच्या दरात १३,७९० ची घसरण झाली आहे.
२ जून रोजी सराफा बाजारात २४-कॅरेट सोन्याचा भाव १५६,२९६ प्रति १० ग्रॅम होता. त्याच्या तुलनेत सोमवारी सोन्याच्या दरात ५,५२८ ची घसरण झाली आहे. दरम्यान, २ जून रोजी चांदीचा भाव २६६,२०० होता. तेव्हापासून चांदीच्या भावात ₹२५,०४० ची घसरण झाली आहे.
कच्च्या तेलाच्या किमतीत सुरू असलेल्या वाढीचा परिणाम सोने आणि चांदीच्या किमतींवर स्पष्टपणे दिसून येत आहे. कच्च्या तेलाच्या वाढत्या किमती जगभरात महागाई वाढवत आहेत. यामुळेच मध्यवर्ती बँका सातत्याने व्याजदर वाढवण्याचा विचार करत आहेत, ज्याचा सराफा बाजारावर नकारात्मक परिणाम होत आहे. देशांतर्गत पातळीवर, घटत्या मागणीचा परिणाम जाणवत आहे. लग्नसराई संपली आहे. नवीन हंगाम अजून दूर आहे. सध्याची परिस्थिती सोन्याच्या किमतींवर स्पष्टपणे दिसून येत आहे.



























































