
ओडिशाचे मुख्यमंत्री मोहन चरण माझी यांच्या हेलिकॉप्टरचे सोमवारी सायंकाळी आपत्कालीन लँडिंग करण्यात आले. खराब हवामानामुळे माझी नियोजित वेळेनुसार भुवनेश्वरमध्ये उतरू शकले नाही. प्रतिकूल हवामान आणि जोरदार वाऱ्यांमुळे वैमानिकाने सुरक्षेला प्राधान्य देत हेलिकॉप्टर पुरीकडे वळवले.
इंडिया टीव्हीने दिलेल्या वृत्तानुसार, मोहन चरण माझी यांचे हेलिकॉप्टर भुवनेश्वरमध्ये उतरणार होते. मात्र अचानक हवामान बिघडले. जोरदार वारे वाहू लागले. परिस्थितीचा आढावा घेतल्यानंतर वैमानिकाने हेलिकॉप्टर सुरक्षित ठिकाणी उतरवण्याचा निर्णय घेतला. हेलिकॉप्टर पुरीतील समंगा येथील तात्पुरत्या बसस्थानकावर सुरक्षितपणे उतरले.
हेलिकॉप्टर उतरताच पोलीस आणि प्रशासकीय अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. अधिकाऱ्यांनी तात्काळ सुरक्षा व्यवस्था ताब्यात घेतली आणि आजूबाजूचा परिसर सुरक्षित केला. मुख्यमंत्र्यांचे हेलिकॉप्टर तिथे उतरल्याची बातमी पसरल्याने समंगा बसस्थानक परिसरात मोठ्या संख्येने लोक दाखल झाले.



























































