FIFA World Cup 2026 – अखेर स्कॉटलंडची प्रतीक्षा संपली

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

स्कॉटलंडने हैतीवर 1-0 गोल फरकाने मात करीत फुटबॉल वर्ल्ड कपमध्ये तब्बल 44 वर्षांच्या प्रतीक्षेनंतर सलामीचा सामना जिंकण्याची किमया साधली. जॉन मॅक्गिनच्या निर्णायक गोलच्या जोरावर स्कॉटलंडने विजय मिळवित गट ‘क’मध्ये अव्वल स्थान मिळवले. स्कॉटलंडला या प्रतिष्ठेच्या स्पर्धेत 36 वर्षांनंतर विजय मिळाला.

दोन्ही संघांनी वेगवान सुरुवात केली. स्कॉटलंडच्या स्कॉट मॅकटॉमिनेचा हेडर सुरुवातीला लक्ष्यभ्रष्ट ठरला, तर त्याचा आणखी एक फटका पोस्टला लागून परत आला. 29 व्या मिनिटाला चे अॅडम्सने बेन गॅनन-डोकला चेंडू दिला. त्याच्या क्रॉसला हैतीच्या बचावपटूंनी अडवले, मात्र चेंडू बॉक्सच्या बाहेर उभ्या असलेल्या जॉन मॅक्गिनकडे आला.

मॅक्गिनने जोरदार फटका मारला आणि चेंडू डिफ्लेक्शन घेत थेट गोलमध्ये शिरला. गोल स्वीकारल्यानंतर हैतीने बरोबरीसाठी जोरदार प्रयत्न केले. रुबेन प्रोव्हिडन्स आणि फ्रौंट्झडी पिएरो यांनी काही धोकादायक संधी निर्माण केल्या, मात्र स्कॉटलंडचा गोलरक्षक अँगस गन आणि बचावफळीने भक्कम कामगिरी करत आघाडी कायम राखली.