मारुतीची कृपा… पाकिस्तानला गुडघे टेकवायला लावणाऱ्या दीप्ती शर्माने मानले देवाचे आभार, 10 धावांत घेतल्या 5 विकेट्स

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

इंग्लंडमध्ये सुरू असलेल्या आयसीसी महिला टी-20 विश्वचषकात हिंदुस्थानने पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानचा 64 धावांनी धुव्वा उडवला. या लढतीत हिंदुस्थानचा स्टार अष्टपैलू खेळाडू दीप्ती शर्मा हिने 10 धावांत 5 विकेट्स घेण्याचा कारनामा केला. टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील ही तिची सर्वोत्तम कामगिरी ठरली आहे. या कामगिरीमुळे तिला ‘प्लेअर ऑफ द मॅच’ पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. पाकिस्तानचे कंबरडे मोडण्याचे श्रेय दीप्ती शर्मा हिने पवनपुत्र हनुमानाला दिले आहे.

हिंदुस्थानने दिलेल्या 171 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना पाकिस्तानची स्थिती एकवेळ 3 बाद 75 अशी मजबूत होती. मात्र, दीप्ती शर्माने आपल्या फिरकीच्या जोरावर सामन्याचे चित्र पूर्णपणे बदलून टाकले. दीप्तीने अवघ्या 10 धावांमध्ये 5 विकेट्स घेतल्या. त्यामुळे पाकिस्तानचा डाव 17 षटकांत 106 धावांवर आटोपला. या लढतीनंतर बोलताना दीप्तीने देवाचे आभार मानले. या यशाचे सर्व श्रेय संघाला जाते आणि मी अत्यंत कृतज्ञ आहे. हनुमान महान आहेत, असे ती म्हणाली.

मला अशा खेळपट्ट्यांवर गोलंदाजी करायला आवडते जिथे चेंडूला टर्न मिळतो. मी प्रत्येक चेंडूवर आणि प्रत्येक षटकात आपल्या गतीमध्ये बदल करत गेले. याचा मला प्रचंड फायदा झाला. माझा स्वतःवर विश्वास आहे. मी चेंडू हवेत थोडा संथ गतीने टाकते आणि अचूक टप्प्यावर लक्ष केंद्रित करते, आज मी तेच केले, असेही ती म्हणाली. तसेच आयसीसी स्पर्धांमध्ये खेळायला आपल्याला विशेष आवडत असल्याचेही तिने आवर्जून नमूद केले.

हिंदुस्थानचा वर्ल्ड कप विजयोत्सव कायम, महिलांनीही पाकिस्तानला चिरडले; स्मृती-दीप्तीची मॅचविनिंग कामगिरी

दरम्यान, नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना हिंदुस्थानच्या महिला संघाने 6 बाद 170 अशी आव्हानात्मक धावसंख्या उभारली होती. सलामीवीर स्मृती मानधनाने 68 धावांची खेळी केली, तर रिचा घोषने अखेरच्या षटकांमध्ये वेगवान 34 धावा फटकात संघाला मजबूत स्थितीत पोहोचवले. प्रत्युत्तरादाखल पाकिस्तानने आक्रमक सुरुवात केली होती. पॉवरप्लेच्या 6 षटकांत पाकिस्तानने 52 धावा कुटल्या. मुनीबा अलीला सुरुवातीला दोन जीवदानं मिळाली. याचा फायदा फायदा उठवत तिने 41 धावांची खेळी केली.

पाकिस्तान मजबूत स्थितीत असताना हिंदुस्थानच्या फिरकीपटूंनी सामन्यावर नियंत्रण मिळवले. दीप्तीने प्रथम गुल फिरोजाला बाद करत भागीदारी तोडली. त्यानंतर आयेशा जफरलाही तिने स्वस्तात माघारी धाडले. एन. श्री चराणीने सायरा जबीनला बाद करत पाकिस्तानला तिसरा धक्का दिला. सामन्याचा खरा टर्निंग पॉईंट तेव्हा आला जेव्हा धोकादायक ठरणाऱ्या मुनीबा अलीला दीप्ती शर्माने बॅकवर्ड पॉईंटवरून थेट थ्रो मारत धावबाद केले. या धक्क्यातून पाकिस्तानचा संघ शेवटपर्यंत सावरू शकला नाही.