
वर्ल्ड कप आणि पाकिस्तान हे समीकरण हिंदुस्थानसाठी नेहमीच ‘विजयाचं वरदान’ ठरलंय. इतिहास आणि कागदोपत्री आकडेवारी हेच ओरडून सांगत आलीय. वर्ल्ड कप 50 षटकांचा असो वा 20 षटकांचा, पुरुषांचा असो वा महिलांचा, वर्ल्ड कपमध्ये पाकिस्तानविरुद्ध हिंदुस्थानचीच ‘दादागिरी’ चालते. ताईगिरी चालते. रविवारी टी-20 महिला वर्ल्ड कपमध्ये हिंदुस्थानच्या रणरागिणींनी हीच परंपरा पुन्हा एकदा दिमाखात जपली. स्मृती मानधनाच्या तडाखेबंद 68 धावा आणि दीप्ती शर्माच्या नागिणीसारख्या फिरकीच्या 5 विकेट्सनी पाकिस्तानला 64 धावांनी असं काही लोळवलं की, 171 धावांचा पाठलाग करताना त्यांचा डाव 17 षटकांत 106 धावांतच संपला. या विजयासह हिंदुस्थानने पाकिस्तानच्या माथी कोरले, ‘ये नया हिंदुस्थान है, वर्ल्ड कप में सिर्फ जितना जानता है!’
हिंदुस्थानचे 171 धावांचे आव्हान पाकिस्तानी संघाला पेलवणार नाही, हे जाणवतच होतं. तरीही पाकिस्तानने पॉवर प्लेमध्ये 1 बाद 52 धावा करत दम दाखवला. मुनीबा अली (41) चांगली फटकेबाजी करून झुंज दिली. तिची झुंज धडकी भरवणारी होती, पण अनुभवी दीप्ती शर्माने फिरकीचा असा काही ‘स्पिन-बॉम्ब’ टाकला की पाकिस्तानचा डाव उद्ध्वस्त झाला. 2 षटकांत फक्त 10 धावा देत तिने 5 विकेट घेत पाकिस्तानचा खेळच खल्लास केला. ही तिची कारकिर्दीतील सर्वश्रेष्ठ गोलंदाजी ठरली. गुल फिरोजा, आयशा जाफर, आलिया रियाज, तस्मिया रुबाब आणि नाशरा संधू यांना तिने थेट तंबूत धाडलं. डावखुऱ्या चरनीने 21 धावांत 3 विकेट घेत ‘तडका’ मारला. मुनीबा वगळता एकीलाही 20 धावांचा टप्पा ओलांडता आला नाही. कॅप्टन फातिमा सनाला भोपळाही पह्डता आला नाही. वर्ल्ड कपमध्ये पाकिस्तानविरुद्ध हिंदुस्थानचंच वर्चस्व चालतं, हे पुन्हा एकदा सिद्ध झालं.
त्याआधी नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करणाऱ्या हिंदुस्थानची सुरुवात चौथ्याच षटकात 18 धावांवर 2 बाद अशी डळमळीत झाली. शेफाली 6, जेमिमा 1 धावेवर तंबूत परतली, पण मैदानात उतरली स्मृती मानधना. नशिबाने तिला 27 आणि 50 धावांवर दोनदा जीवदान दिले आणि तिने पाकिस्तानी गोलंदाजीची पार वाट लावली. 44 चेंडूंत 9 चौकार, 2 षटकार ठोकत तिने 68 धावांची फटकेबाजी केली. कर्णधार हरमनप्रीत कौरने 36 धावा करत स्मृतीसोबत तिसऱ्या विकेटसाठी 91 धावांची मॅचविनिंग भागीदारी रचली. शेवटी ऋचा घोषने 17 चेंडूंत 5 चौकार, 1 षटकारासह 34 धावांची आतषबाजी केली आणि नाबाद दीप्तीसोबत 21 चेंडूंत 45 धावांची वेगवान भागीदारी करत हिंदुस्थानला 6 बाद 170 धावांवर नेले. हीच भागी हिंदुस्थानसाठी बळ देणारी ठरली.

























































