FIFA World Cup 2026 अमेरिकेने इराणच्या संघाला देशाबाहेर काढले

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

फिफा विश्वचषकातील पहिल्याच सामन्यानंतर इराणच्या संघाने संताप व्यक्त केला आहे. न्यूझीलंडविरुद्धचा सामना 2-2 असा बरोबरीत सुटल्यानंतर प्रशिक्षक अमीर घालेनोई यांनी आपल्या संघाला स्पर्धेतील ‘सर्वाधिक पीडित संघ’ संबोधत प्रवास व्यवस्थेवर तीव्र नाराजी व्यक्त केली. कारण अमेरिकेने इराणच्या संघाला सामना संपल्यावर लगेच देशाबाहेर काढल्याचे पाहायला मिळाले.

राजकीय तणावाच्या पार्श्वभूमीवर खेळल्या गेलेल्या या सामन्यानंतर इराणला तत्काळ अमेरिकेबाहेर जाऊन मेक्सिकोतील तिजुआना येथील तळावर परतण्याचे आदेश देण्यात आल्याचा आरोप घालेनोई यांनी केला. ‘आम्ही सतत विमानप्रवास करत आहोत. खेळाडूंना विश्रांतीसाठी पुरेसा वेळही दिला जात नाही. सामन्यानंतर लगेच निघण्यास सांगितले गेले. ही आमच्यासाठी मोठी अडचण आहे,’ असे त्यांनी सांगितले.

विश्वचषकापूर्वी इराणचा बेस कॅम्प ऑरिझोनाऐवजी मेक्सिकोतील तिजुआना येथे हलविण्यात आला होता. विशेष म्हणजे, गटातील तिन्ही सामने अमेरिकेत असतानाही संघाला प्रत्येक सामन्यापूर्वी आणि नंतर वारंवार सीमा ओलांडून प्रवास करावा लागत आहे. याशिवाय इराण फुटबॉल महासंघाचे अध्यक्ष मेहदी ताज आणि काही सहाय्यक कर्मचाऱ्यांना अमेरिकेत प्रवेश नाकारण्यात आल्याने संघाच्या अडचणी वाढल्या आहेत.