
रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल आणि त्यांच्या कथित गर्लफ्रेंडबद्दल मोठा गौप्यस्फोट करणारे ज्येष्ठ रशियन पत्रकार ग्रिगोरी नेखोरोशेव यांचा मृत्यू झाला आहे. लॅटव्हियाची राजधानी रिगा येथे विषारी मशरूम खाल्ल्याने त्यांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. नेखोरोशेव हे गेल्या ११ वर्षांपासून रिगामध्ये राजकीय निर्वासित म्हणून जीवन जगत होते. त्यांच्या मित्रांनी दिलेल्या माहितीनुसार, नेखोरोशेव याना त्यांच्या अंगणात मशरूम मिळाले होते, जे त्यांनी खाल्ले होते. मात्र प्रकृती बिघडून त्यांचा मृत्यू झाल्यानंतर ते मशरूम विषारी असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. टीव्ही९ भारतवर्षने यासंदर्भात वृत्त दिले आहे.
ग्रिगोरी नेखोरोशेव हे मॉस्कोव्स्की कोरेस्पोंडेंट या रशियन वृत्तपत्राचे मुख्य संपादक होते. साल २००८ मध्ये त्यांनीच सर्वताआधी व्लादिमीर पुतिन आणि प्रसिद्ध जिम्नॅस्ट अलिना काबायेवा यांच्यातील प्रेमसंबंधांचा खुलासा केला होता. पुतिन हे आपली पहिली पत्नी ल्युडमिला यांना घटस्फोट देऊन अलिनासोबत विवाहबंधनात अडकणार असल्याचा खळबळजनक दावा या वृत्तात करण्यात आला होता. या बातमीनंतर पुतिन यांनी संताप व्यक्त करत, लोकांच्या वैयक्तिक आयुष्यात डोकावणाऱ्या वृत्तीवर सडकून टीका केली होती. या वादानंतर वृत्तपत्राचे मालक अलेक्झांडर लेबेदेव यांच्यावर दबाव आणून ते वृत्तपत्रच बंद पाडण्यास भाग पाडले गेले होते. तसेच रशियन गुप्तचर यंत्रणांनी नेखोरोशेव यांची कसून चौकशीही केली होती, ज्यामुळे त्यांना रशियातून पलायन करावे लागले होते.
रशियाच्या डोसियर सेंटर या शोध पत्रकारिता संस्थेने दिलेल्या माहितीनुसार, पुतिन आणि अलिना काबायेवा यांना इव्हान आणि व्लादिमीर ज्युनियर अशी दोन मुले आहेत. तर पुतिन यांना त्यांच्या पहिल्या पत्नीपासून मारिया आणि कतरिना या दोन मुली आहेत. पुतिन यांच्या या गुप्त आयुष्याला जगासमोर आणणाऱ्या नेखोरोशेव यांच्या अचानक आणि संशयित मृत्यूमुळे आता आंतरराष्ट्रीय स्तरावर पुन्हा एकदा अनेक चर्चांना उधाण आले आहे.

























































