विद्युत मोटारीचा पतीला शॉक बसला, वाचायला गेलेल्या पत्नीचाही मृत्यू

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

शेतावरील विद्युत मोटार बंद करताना शॉक लागून शेतकऱ्याचा जागीच मृत्यू झाला. पतीला शॉक लागल्याचे पाहून मदतीसाठी मोठ्या धाडसाने गेलेली पत्नी देखील शॉक लागून मृत्युमुखी पडली. ऐन वटपौर्णिमेच्या दिवशी शेतकरी दाम्पत्याचा दुर्दैवी मृत्यू झाल्याने आंबे गावात हळहळ व्यक्त होत आहे.

लक्ष्मण बाबू नागणे (वय 60) आणि अलका लक्ष्मण नागणे (55) अशी या मृत शेतकरी पती-पत्नीची नावे आहेत. याबाबत मिळालेली माहिती अशी की, गावच्या परिसरात शेती पंपाची वीज पहाटे 4.45 वाजता येते. रविवारी रात्रभर परिसरात जोरदार पाऊस सुरू होता. पावसामुळे नदीवरील विजेची मोटार बंद करण्यासाठी शेतकरी लक्ष्मण नागणे हे पहाटेच्या सुमारास गेले होते. मात्र, रात्रभर झालेल्या पावसामुळे तिथे वीज प्रवाहाचा बिघाड झाला होता. मोटार बंद करत असताना अचानक लक्ष्मण नागणे यांना विजेचा जोरदार शॉक लागला. आपल्या पतीला विजेचा धक्का लागल्याचे आणि ते विव्हळत असल्याचे पाहून पत्नी अलका नागणे या घाबरल्या. पतीचे प्राण वाचवण्यासाठी त्या तात्काळ त्यांच्या दिशेने धावल्या आणि त्यांना बाजूला ओढण्याचा प्रयत्न केला. परंतू, पाऊस आणि ओलाव्यामुळे वीज प्रवाह वेगाने पसरला. वीजेचा धक्का अलका नागणे यांनाही बसला आणि त्याही जागेवर कोसळल्या. या दुर्दैवी अपघातात काही क्षणांतच शेतकरी पती-पत्नी दोघांचाही जागीच मृत्यू झाला आहे.

या घटनेची माहिती मिळताच पंढरपूर तालुका पोलीस घटनास्थळी दाखल झाले, दोन्ही मृतदेह शवविच्छेदनाकरीता पंढरपूर उपजिल्हा रुग्णालय येथे दाखल करण्यात आले. पुढील तपास पोलीस करत आहेत.

शासकीय मदतीची मागणी

लक्ष्मण लागणे व अलका नागणे या पती पत्नीचा मृत्यू झाल्याची माहिती मिळताच आंबे गावातील ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली. एकाच वेळी कुटुंबातील दोन्ही छत्र हरपल्याने नागणे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. दरम्यान, या अत्यंत गरीब शेतकरी दाम्पत्याच्या मागे असलेल्या कुटुंबाला शासनाकडून तातडीने आर्थिक मदत देण्यात यावी, अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे तालुकाध्यक्ष सचिन पाटील यांनी प्रशासनाकडे केली आहे.