
माढा ग्रामीण रुग्णालयात खैराव (ता. माढा) येथील महिलेची शस्त्रक्रियेद्वारे प्रसूती करण्यात आल्यानंतर तिला आरामाची गरज असताना ती दाखल असलेल्या रुग्ण विभागाची स्वच्छता, तसेच तिच्या पतीला स्वच्छतागृह स्वच्छ करावे लागत असल्याचेगंभीर प्रकरण समोर आले होते. याच्या चौकशीअंती अधीक्षक, प्रभारी परिचारिकांसह नऊ कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आले. तब्बल 14 महिन्यांनंतर याप्रकरणी आरोग्य विभागाकडून कारवाई करण्यात आली. याप्रकरणी दैनिक ‘सामना’ने 11 एप्रिल 2025 रोजी आवाज उठवला होता.
खैराव (ता. माढा) येथील एका महिलेची माढा ग्रामीण रुग्णारलया शस्त्रक्रियेद्वारे प्रसूती करण्यात आली होती. प्रसूती झालेल्या महिलेला आरामाची गरज असताना ती ज्या रुग्ण विभागात होती, त्याची स्वच्छता तिला करावी लागत होती. तसेच तिच्या पतीला स्वच्छतागृह स्वच्छ करावे लागत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला होता. जिल्हा आरोग्य विभागात याविषयी तक्रारी दाखल झाल्याने चौकशी करण्यात आली. चौकशी समितीला रुग्ण विभागातील कर्मचाऱयांचा कर्तव्याबाबत निष्काळजीपणा, हलगर्जीपणा निदर्शनास आल्यानंतर संबंधित कर्मचाऱयांवर कारवाई करण्यात आली. ही कारवाई करण्यासाठी आरोग्य विभागाने तब्बल 14 महिने घेतले. कारवाई करण्यात आली असली, तरी कारवाईसाठी एवढी दिरंगाई का? हा प्रश्न नव्याने उपस्थित होत आहे.
ग्रामीण भागातील रुग्णांना उत्तम आरोग्य सेवा मिळणे गरजेचे असताना कर्मचारी याबाबत निष्काळजीपणा, हलगर्जीपणा दाखवत असल्यामुळे आरोग्य सेवेच्या मूळ हेतूला काळिमा फासला जात असल्याने याविषयी जनमानसात तीक्र संतापाची भावना होती. अखेर आरोग्य विभागाने या प्रकाराची गंभीर दखल घेऊन अधीक्षक, प्रभारी परिचारिका यांच्यासह नऊ जणांवर निलंबनाची कारवाई केली.
सर्वसामान्यांना वेळेत, योग्य आणि कोणतीही गैरसोय न होता उपचार होणे गरजेचे असताना अशा घटना घडत आहेत. त्या होऊ नयेत याची काळजी आरोग्य विभागाने घ्यावी. या प्रकारात कारवाई होण्यासाठी एवढा विलंब का लागला? भविष्यात असे प्रकार होऊ नयेत, याची खबरदारी घेणे गरजेचे आहे. यासाठी जबाबदारी निश्चित करून विभागीय उपाययोजना कराव्यात, जेणेकरून सर्वसामान्यांना त्रास होणार नाही.
– शंभूराजे साठे, तक्रारदार, माढा





























































