
अनेक वेळा मुदतवाढ दिल्यानंतर आणि सलग आठ दिवस बंद राहिल्यानंतर, कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेची (EPFO) वेबसाइट अखेरीस पुन्हा सुरू झाली आहे. मात्र, अद्यापही काही सेवा वापरताना अडचणी येत आहेत. EPFO वेबसाइटवरील सॉफ्टवेअर अपडेट्स आणि देखभालीचे काम पूर्ण झाले आहे. त्यानंतर शुक्रवारी दुपारी या सेवा पूर्ववत करण्यात आल्या आहेत.
याबाबत EPFO ने आपल्या पोर्टलवर माहिती दिली आहे. त्यात ईपीएफओने (EPFO) म्हटले आहे की, सेवा वितरण आणि कार्यपद्धती सुधारण्यासाठी महत्त्वपूर्ण डेटाबेस आणि सॉफ्टवेअर अपग्रेड यशस्वीरित्या पूर्ण झाले आहेत. सदस्य आणि नियोक्ता सेवा यशस्वीरित्या सुरू करण्यात आल्या असून त्या वापरासाठी उपलब्ध आहेत.
दावे आणि सेवा विनंत्यांवर टप्प्याटप्प्याने आणि पद्धतशीरपणे प्रक्रिया केली जाईल. सुरुवातीच्या दोन आठवड्यांच्या कालावधीत अचूकता सुनिश्चित करण्यासाठी अतिरिक्त पडताळणी आणि प्रमाणीकरण तपासणी देखील केली जाईल. सदस्य आणि नियोक्त्यांना संयम ठेवण्याची विनंती करण्यात आली आहे. या कालावधीत दाव्यांवर प्रक्रिया करण्यास आणि काही सेवांना नेहमीपेक्षा थोडा जास्त वेळ लागू शकतो. सदस्यांना व्यस्त वेळेत वारंवार ऑनलाइन सेवा वापरणे किंवा वारंवार विनंत्या करणे टाळण्यास सांगण्यात आले आहे. ईपीएफओ आपल्या सर्व सदस्यांच्या संयमाची आणि सहकार्याची प्रशंसा करते आणि आपल्या सर्व सदस्यांना सेवा प्रदान करण्यासाठी वचनबद्ध आहे, असे ईपीएफओने म्हटले आहे.
ईपीएफओने फक्त एवढेच सांगितले आहे की सर्व सॉफ्टवेअर अपग्रेड केले गेले आहे. तथापि, कोणती नवीन वैशिष्ट्ये सादर केली गेली आहेत किंवा दावा किंवा इतर प्रक्रिया किती सोप्या असतील याबद्दल तपशील दिलेला नाही. त्यांनी फक्त एवढेच सांगितले की देखभाल कार्य आणि सॉफ्टवेअर अपग्रेड सुरू आहेत. ईपीएफओची वेबसाइट गेल्या सात दिवसांपासून बंद होती. ईपीएफओने सांगितले की, सदस्यांना उत्तम सेवा देण्यासाठी आवश्यक डेटा आणि सॉफ्टवेअर अद्ययावत केले जात असल्यामुळे ही सेवा बंद होती.






























































