
अमरावती येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयासाठी आलियाबाद येथील जमीन शासनाने निश्चित करून तिचा ताबाही घेतला होता. मात्र संबंधित जागा वनक्षेत्रात येत असल्याचे निदर्शनास आल्याने हे प्रकरण पेंद्र शासनाच्या मंजुरीसाठी पाठविण्यात आले आहे, अशी माहिती वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिली. अमरावती येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या इमारतीसाठी जागा निश्चित करण्याबाबतचा प्रश्न विधान परिषदेत आमदार संजय खोडके यांनी उपस्थित केला. वैद्यकीय महाविद्यालयाच्या इमारतीचे बांधकाम आणि शिक्षण व्यवस्था लवकर सुरू करण्यासाठी आवश्यक ती कार्यवाही वेगाने करण्यात येत आहे. प्राध्यापक, पंत्राटी कर्मचारी तसेच स्थानिक लोकप्रतिनिधींसोबत बैठक घेऊन प्रलंबित प्रश्न मार्गी लावले जातील.




























































