झाड कोसळून ४ ठाणेकर जखमी झाल्यानंतर उपमुख्यमंत्र्यांना जाग, आपत्ती विभागातील एकाला नोटीस; वृक्षप्राधिकरणातील एकाची बदली

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

पावसाळा सुरू झाला तरी ठाण्यात अनेक ठिकाणी झाडांच्या फांद्या छाटणीची कामे लटकली आहेत. पालिकेच्या या भोंगळ कारभारामुळे आठवडाभरात झाडे उन्मळून चार पादचारी जखमी झाले. यानंतर जाग आलेले उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी संताप व्यक्त करत कारवाईचे आदेश दिले. दरम्यान पालिका आयुक्त सौरभ राव यांनी आपत्ती विभागातील एका अधिकाऱ्याला नोटीस बजावली असून वृक्षप्राधिकरण विभागातील एका अधिकाऱ्याची तात्काळ बदली करण्यात आली आहे.

पावसाळ्यात यंदा शहरातील झाडे पडण्याचे प्रमाण वाढलेले आहे. सतत पडणाऱ्या पावसाच्या माऱ्याने झाडे पडली असून या घटनेत तीन पुरुष तर एक महिला जखमी आहे. घटनेतील सर्व जखमींवर विविध रुग्णालयात उपचार सुरू असून दोनजणांची प्रकृती गंभीर आहे. दरम्यान ठाण्यात पडलेल्या झाडांवरून एकनाथ शिंदे आज संतापले, पालिकेच्या आपत्ती कक्षाला भेट देत अधिकाऱ्यांकडून आढावा घेतला. फांद्यांच्या छाटणीचा अहवाल द्या, पडलेल्या झाडांची छाटणी कधी केली याचा जाब त्यांनी अधिकाऱ्यांना विचारला.

या अधिकाऱ्यांना दणका

सहाय्यक आयुक्त तथा वृक्ष अधिकारी राजेश सोनावणे यांची बदली करण्यात आली आहे. दरम्यान वृक्ष अधिकारी या पदाचा कार्यभार उद्यान अधीक्षक केदार पाटील यांच्याकडे सोपवण्यात आला आहे तर आपत्ती व्यवस्थापन अधिकारी यासीन तडवी यांना कामकाजात सुधारणा करण्याबाबत नोटीस बजावण्यात आली आहे.