
अहिल्यानगर-पाथर्डी रस्त्यावरील मेहकरी आणि मराठवाडीजवळ अन्न आणि औषध प्रशासनाच्या विविध पथकांनी शुक्रवारी (दि. 10) सकाळी छापे टाकले. दिवसभर ही कार्यवाही सुरू होती. दुधाचे नमुने तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठविणार असे सांगण्यात येत आहे. अन्न आणि औषध विभागाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण राज्यात दूध भेसळखोरांच्या मुसक्या आवळण्यासाठी राज्यभर धडक कारवाई करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
दूध भेसळखोरांवर कठोरात कठोर कारवाई करण्यासाठी आणि संशयित नमुने तपासणीसाठी विशेष मोहीम हाती घेण्यात आली आहे. त्या अनुषंगाने शुक्रवारी सकाळीच विविध वाहनांतून नाशिकचे पथक अहिल्यानगरमध्ये दाखल झाले. त्यांनी अहिल्यानगर-पाथर्डी रस्त्यावरील मेहकरी आणि मराठवाडीजवळील दूध केंद्रांवर छापे टाकून दूध संकलन करणाऱ्या केंद्रांमधील दुधाचे नमुने तपासणीसाठी ताब्यात घेतले.
अन्न आणि औषध विभागाच्या या अचानक छापे सत्रामुळे दूध संकलन करणाऱ्या दूध डेअरी चालकांमध्ये खळबळ उडाली असून, या छापा सत्रामध्ये सर्व दूध डेअरींमधील रेकॉर्ड आणि दूध देणाऱ्या व्यावसायिकांचा आढावा घेण्याचे काम दिवसभर सुरू होते. त्यामुळे या दूध डेअरी चालकांमध्ये कोणी दोषी आढळते काय, याकडे लक्ष लागले आहे.
अहिल्यानगर जिल्ह्यावर विशेष लक्ष
दूध संकलनात अहिल्यानगर जिल्ह्याचा राज्यात चांगला लौकिक आहे. तुकाराम मुंढे यांच्या धसक्यामुळे सध्या दूध संकलनाचा आकडा कमी झाला आहे. त्यामुळे अहिल्यानगर जिल्ह्यात भेसळयुक्त दूध तयार केले जात असल्याचा संशय अधिक गडद झाला आहे. या पार्श्वभूमीवर नाशिकहून अहिल्यानगरमध्ये दाखल झालेल्या पथकाने मेहकरी येथे 6 व मराठवाडीजवळ 2 ठिकाणी अशा एकूण 8 ठिकाणी छापे टाकले असून, हे पथक अद्याप अहिल्यानगरमध्येच ठाण मांडून आहे.
सावळीविहीरच्या केंद्राचा परवाना निलंबित
अन्नसुरक्षा व मानके कायदा तसेच नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी राहाता तालुक्यातील सावळीविहीर येथील साई जतिन दूध संकलन केंद्राचा परवाना तत्काळ प्रभावाने पुढील आदेशापर्यंत निलंबित करण्यात आला आहे. जनहित व जनआरोग्याच्या दृष्टीने ही कारवाई करण्यात आली आहे, अशी माहिती सहायक आयुक्त (अन्न) अ. अ. भोईटे यांनी दिली. अन्न व औषध प्रशासनाने 9 जुलै रोजी संबंधित दूध संकलन केंद्राची तपासणी केली.



























































