मध्य रेल्वे कोलमडली, घाटकोपरजवळ एक्सप्रेस उभ्या करून ठेवल्याने लोकल ट्रेनचा खोळंबा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

शहरात सध्या पावसाने विश्रांती घेतली असताना बुधवारी दुपारी मध्य रेल्वेची लोकलसेवा एक्सप्रेसमुळे कोलमडली. कुर्ला येथील लोकमान्य टिळक टर्मिनसकडे (एलटीटी) येणाऱ्या एक्सप्रेस घाटकोपरदरम्यान उभ्या करून ठेवल्याने अप दिशेने येणाऱ्या लोकल ट्रेनचा खोळंबा झाला. डाऊन दिशेने जाणाऱ्या लोकल वेळेत न आल्यामुळे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी) स्थानकात प्रवाशांची तासन्तास रखडपट्टी झाली. घरी परतताना प्रवाशांची गैरसोय झाली.

बुधवारी दुपारी पाऊस नसतानाही लोकलच्या विस्कळीत वेळापत्रकाचा मनस्ताप प्रवाशांना सहन करावा लागला. दुपारी एलटीटीकडे येणाऱ्या काही एक्सप्रेस घाटकोपर स्थानकाजवळ थांबून ठेवल्या होत्या. एक्सप्रेस आणि लोकल गाडय़ांच्या वेळापत्रकाचा ताळमेळ जुळवताना रेल्वे प्रशासनाला कसरत करावी लागली. दरम्यान, रेल्वे प्रवासी संघटनांकडून मध्य रेल्वेच्या नियोजनशून्य कारभारावर संतप्त प्रतिक्रिया नोंदवल्या जात आहेत. प्रवाशांच्या संयमाचा अंत पाहिला जात आहे. आता प्रशासनावर धडक देण्याची वेळ आली आहे, अशी प्रतिक्रिया महाराष्ट्र महिला प्रवासी संघटनेच्या अध्यक्षा वंदना सोनावणे यांनी दिली.