दडपशाहीविरोधात विद्यार्थी एकवटले, शिवाजी पार्कात तिसऱ्या दिवशीही आंदोलक ठाम

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सोनम वांगचुक व कॉक्रोज जनता पार्टीच्या जंतरमंतरवरील आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी रविवारी शिवसेनेने पुकारलेल्या आंदोलनात ‘मैदानात’ उतरलेली तरुणाई अजूनही छत्रपती शिवाजी महाराज मैदान आणि चैत्यभूमी येथे ठाण मांडून बसत आहे. या आंदोलकांना हटवण्यासाठी पोलिसांनी बळाचा वापर करून आंदोलकांना हटवण्याचा प्रयत्न केला. मात्र आंदोलक हटण्यास तयार नाहीत.

‘नीट’ पेपरफुटी प्रकरणी शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यासाठी गेल्या 22 दिवसांपासून हे आंदोलन सुरू आहे. नीट पेपरफुटीनंतर 22 विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. मात्र सरकारकडून केवळ कारवाईचा फार्स सुरू आहे. याविरोधात जंतरमंतरवर सुरू असलेल्या आंदोलनाला शिवसेनेने पाठिंबा देत रविवारी जोरदार आंदोलन केले. या आंदोलनात शिवसैनिकांसह हजारोंच्या संख्येने विद्यार्थी, सर्वसामान्य नागरिक, मुंबईकर सहभागी झाले होते.

पोलिसांची दडपशाही झुगारली

शिवतीर्थावर रविवारी आंदोलन झाल्यानंतर दोन दिवसांपासून विद्यार्थी-आंदोलक छत्रपती शिवाजी महाराज मैदान आणि चैत्यभूमी येथे ठाण मांडून सरकारच्या हुकूमशाहीचा निषेध करीत आहेत. 6 ऑगस्टपर्यंत मुंबईत जमावबंदी लागू केल्याचे कारण देत पोलीस पोलिसांकडून आंदोलकांची धरपकड सुरू असून गुन्हे दाखल केले जात आहेत. नोटीस बजावून आंदोलकांना पोलीस ठाण्यात बोलवले जात आहे. मात्र विद्यार्थ्यांनी गटागटाने येऊन आंदोलन सुरूच ठेवले आहे. आतापर्यंत शेकडो विद्यार्थी-आंदोलकांवर पोलिसांनी गुन्हे दाखल केले आहेत.