
नीट (NEET) पेपरफुटी प्रकरणी दिल्लीच्या जंतरमंतरवर सुरू असलेल्या विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला विरोधी पक्षांनी पाठिंबा जाहीर केला आहे. मंगळवारी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांनी आंदोलनस्थळी भेट देऊन विद्यार्थ्यांशी चर्चा केली. त्यानंतर, बुधवारी सकाळी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेऊन विद्यार्थ्यांच्या मागण्या मांडल्या आणि पेपरफुटीच्या समस्येवर ठोस उपाययोजना करण्याबाबत सविस्तर भूमिका मांडली.
दिल्लीत लोकशाही मार्गाने आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर पोलिसांनी केलेल्या अमानुष लाठीहल्ल्याचा सर्वच स्तरातून निषेध होत आहे. त्यातच राष्ट्रवादीचे नेते शरद पवार आणि खासदार सुप्रिया सुळे यांनी अचानक पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेतल्याने राजकीय वर्तुळात तर्कवितर्क लढवले जात होते. दरम्यान, शरद पवार यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत या भेटीत नेमकी काय चर्चा झाली, याबाबत माहिती दिली.
नीट परीक्षेतील पेपरफुटीच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांनी केलेले आंदोलन, त्या आंदोलनादरम्यान पोलिसांकडून विद्यार्थ्यांना झालेली अयोग्य वागणूक, विद्यार्थ्यांवर दाखल करण्यात आलेले गुन्हे, तसेच देशातील व महाराष्ट्रातील शेती क्षेत्रातील प्रशासकीय व धोरणात्मक त्रुटी, शेतकऱ्यांच्या गंभीर समस्या आणि प्रलंबित मागण्या या विषयांवर त्यांनी मोदींची भेट घेऊन चर्चा केली. या सर्व प्रश्नांवर सकारात्मक आणि ठोस उपाययोजना करण्याचे आश्वासन पंतप्रधान मोदींनी दिल्याचे त्यांनी सांगितले.
आत्मीयतेने स्वागत
विद्यार्थी आंदोलनावरून दिल्लीत तणावाचे वातावरण असताना पंतप्रधान मोदी आणि शरद पवार यांची मात्र हसतखेळत भेट झाली. मोदी यांनी शरद पवार यांचा हात धरून त्यांना आपल्या कार्यालयात नेले आणि त्यांचे आत्मीयतेने स्वागत केले. या दोघांचे मनमोकळेपणाने हसतानाचे आणि चर्चा करतानाचे फोटोही समोर आले आहेत.



























































