महत्त्वाच्या बातम्या – एमपीएससी परीक्षा जुलै २०२७ पर्यंत ऑफलाइन

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

एमपीएससीने शासकीय पदांसाठी घेण्यात येणाऱ्या परीक्षा प्रचलित ओएमआर पद्धतीनेच घेण्यात याव्यात अशी मागणी झाली होती. ऑनलाइन परीक्षा पद्धत सुरू करण्यापूर्वी तशी सज्जता असायला हवी आणि विद्यार्थ्यांना सरावासाठी वेळही द्यायला हवा अशा सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्या होत्या. त्यामुळे एमपीएससीने ऑनलाइन परीक्षेचा निर्णय बदलला असून जुलै २०२७ पर्यंत सर्व परीक्षा ऑफलाइनच घेतल्या जाणार आहेत.

रुग्णाचे यकृत निकामी; आर्थिक मदतीचे आवाहन

जोगेश्वरीतील मेघवाडी येथे राहणारे अनिल माजगावकर यांचे यकृत निकामी झाले असून त्यांच्यावर मुंबईतील ग्लेनिगल्स रुग्णालयात उपचार सुरू आहेत. डॉक्टरांनी त्यांना यकृत प्रत्यारोपणाचा सल्ला दिला आहे. त्यासाठी २५ लाख रुपये खर्च येणार आहे. मात्र त्यांची आर्थिक स्थिती बेताची असल्याने हा खर्च परवडणारा नसल्याने सामाजिक संस्था आणि नागरिकांनी मदत करावी असे आवाहन त्यांच्या कुटुंबीयांनी केले आहे.

मदतीसाठी नाव: अनिल माजगावकर, UHID/IP No. 8400336938. बँक तपशील: A/C NO. 006258875001 IFSC CODE: HSBC0400002.

चुनाभट्टीत पालखी सोहळा

एम. एस. के. प्राथमिक विद्यालय, चुनाभट्टी या शाळेची वृक्षदिंडी व पालखी सोहळा चुनाभट्टी परिसरात आयोजित केला आहे. हा कार्यक्रम उद्या, शुक्रवारी सकाळी १० वाजता होणार आहे. यानिमित्ताने लेझीम, पालखी सोहळा होणार असून दत्तमंदिर येथे रिंगण सोहळा होईल. तेथे महिला पालक फुगड्या खेळणार आहेत.