बांधकाम व्यावसायिकास ठार मारण्याची धमकी देत 25 लाखांची खंडणी वसूल, म्होरक्यासह 12 जणांची टोळी गजाआड

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
crime news new

एका बांधकाम व्यावसायिकास ठार मारण्याची धमकी देत त्यांच्याकडून २५ लाखांची खंडणी वसूल करणाऱ्या एका कुप्रसिद्ध गुंडासह १२ जणांच्या टोळीला गुन्हे शाखा युनिट-९ ने जेरबंद केले. या टोळीने अनेक बांधकाम व्यावसायिकांना अशा प्रकारे धमकावत खंडणी उकळल्याचे समोर येत आहे.

कंत्राटी काम सुरू करायचे असेल तर २५ लाख द्यावे लागतील अन्यथा ठार मारू, अशी धमकी देत कुख्यात गुन्हेगार झुल्फिकार बेहलीम व त्याचा भाऊ मोहसीन बेहलीम यांनी त्यांच्या हस्तकांमार्फत बांधकाम व्यावसायिकाकडून २५ लाखांची खंडणी उकळली. आरोपींकडून त्रास दिला जाणे सुरूच असल्यामुळे बांधकाम व्यावसायिकाने गुन्हे शाखेकडे तक्रार दिली. त्यानंतर उपायुक्त नवनाथ ढवळे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रभारी निरीक्षक सचिन पुराणिक, सपोनि महेंद्र पाटील, जयदीप जाधव, मोहन जगदाळे, श्रीराम घोडके, विजय धोत्रे व त्यांच्या पथकाने तत्काळ कारवाई करत वांद्रे परिसरातून झुल्फिकार, मोहसीन व त्यांच्या १० हस्तकांना खंडणी उकळताना रंगेहाथ पकडले.

जामिनावर बाहेर आल्यावर पुन्हा गुन्हेगारी सुरू

झुल्फिकार याला मोक्काअंतर्गत अटक झाली होती. त्या प्रकरणात जामिनावर बाहेर आल्यानंतर त्याने पुन्हा त्याच्या टोळीसह खंडणी वसूल करण्यास सुरुवात केली. गेल्या काही दिवसांत त्याने वांद्रे व आसपासच्या परिसरातील अनेक बांधकाम व्यावसायिकांकडून खंडणी उकळल्याची माहिती पोलिसांच्या हाती लागली आहे.