
महापालिकेच्या ‘जी दक्षिण’ विभागात कचरा संकलन आणि वाहतुकीसाठी एकात्मिक यंत्रणा कार्यान्वित करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. यामुळे वरळी, प्रभादेवी येथील घनकचरा व्यवस्थापन सेवेवर परिणाम झाला आहे. या भागात नवीन यंत्रणा पूर्णतः कार्यान्वित होण्यासाठी आणखी तीन ते चार दिवस लागणार आहेत. त्यामुळे तेथील नागरिकांना कचऱ्याच्या समस्येला तोंड द्यावे लागणार आहे. नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन पालिका प्रशासनाने केले आहे.
मुंबईतील वाढती कचरा समस्या पाहता पालिकेने घनकचरा व्यवस्थापनासाठी उपाययोजना सुरू केल्या आहेत. कचरा गोळा करणे आणि तो वाहून नेण्यासाठी आवश्यक असणाऱ्या सर्व यंत्रणांमध्ये समन्वय साधला जाणार आहे. पालिकेकडून या संपूर्ण कामकाजासाठी मुंबईत एकूण आठ कंत्राटदारांची नेमणूक करण्यात आली असून टप्प्याटप्प्याने या प्रकल्पाची अंमलबजावणी करण्यात येणार आहे. ३ ऑगस्टपासून पालिकेच्या ‘जी दक्षिण’ विभागात या प्रकल्पाची सुरुवात झालेली आहे. या प्रकल्पाची पूर्ण अंमलबजावणी होईपर्यंत नागरिकांना कचऱ्याच्या समस्येला तोंड द्यावे लागणार आहे.
एकात्मिक प्रकल्पाची वैशिष्ट्ये:
-
मुंबईत दररोज सुमारे ७२०० मेट्रिक टन कचरा निर्माण होतो आणि हा कचरा संकलित करून डम्पिंग ग्राऊंडपर्यंत वाहून नेला जातो. हा कचरा संकलित करणे व त्याची वाहतूक करण्यासाठी यापूर्वी अस्तित्वात असलेल्या निरनिराळ्या यंत्रणांऐवजी आता सर्वसमावेशक असा नवीन प्रकारचा एकात्मिक प्रकल्प सुरू करण्यात येत आहे.
-
याअंतर्गत, वॉर्डमध्ये कचराविषयक सर्व कामकाजांची जबाबदारी एकाच यंत्रणेकडे असेल. यामध्ये कचरा संकलन, वाहतूक करणे, कचऱ्याच्या १.१ घनमीटर क्षमतेच्या डब्यांची निगा राखणे, त्यांचे परिरक्षण करणे; रस्त्याच्या कडेला असलेल्या लिटर बिन्सची प्रस्थापना करणे, त्यांची निगा राखणे तसेच त्यातील कचरा वेळोवेळी वाहून नेणे; नागरिकांनी वर्गीकरण केलेला सुका कचरा वाहून नेणे इत्यादी बाबींचा प्रामुख्याने समावेश आहे.
कॉल सेंटरवर करा तक्रारी:
कचऱ्यासंदर्भात नागरिकांच्या तक्रारींचे निवारण करण्यासाठी एक स्वतंत्र कक्ष (कॉल सेंटर) सुरू होणार आहे. तिथे टोल-फ्री (निःशुल्क) क्रमांकावर तक्रार करता येईल. दरम्यान, या संपूर्ण सेवेसाठी प्रचलित वाहनांपेक्षा अधिक वहन क्षमतेची वाहने वापरली जाणार आहेत. या वाहनांमध्ये कचरा बंदिस्त करून वाहून नेला जाईल, ज्यामुळे कचरा रस्त्यावर पडणार नाही किंवा इतर वाहनधारकांना दिसणार नाही.




























































