
ताप आल्याने मेडिकल स्टोअर्समध्ये चुकीचे इंजेक्शन दिल्याने महिलेचा मृत्यू झाला. बैदेही कुमारी असे मयत महिलेचे नाव आहे. ओडिशाच्या रायगडा जिल्ह्यातील चंडिली येथे ही घटना घडली. आरोपीने दिलेल्या इंजेक्शनमुळेच हा मृत्यू झाल्याचा आरोप करत मृत महिलेच्या कुटुंबीयांनी चंडिली पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी या प्रकरणी आरोपीला ताब्यात घेतले आहे.
एनडीटीव्हीने दिलेल्या वृत्तानुसार, बैदेही यांना गेल्या काही दिवसांपासून ताप आणि सर्दीचा त्रास होत होता. औषधे घेऊनही प्रकृतीत सुधारणा न झाल्याने, त्या गुरुवारी जे.के. पुर येथील एका औषधाच्या दुकानात गेल्या होत्या. तिथे ए. के. भद्रा नावाच्या कर्मचाऱ्याने त्यांना इंजेक्शन दिले. इंजेक्शन घेतल्यानंतर बैदेही यांना तीव्र दुष्परिणाम जाणवू लागले आणि त्यांची प्रकृती वेगाने खालावली. कुटुंबीयांनी त्यांना तातडीने रायगडा जिल्हा मुख्यालय रुग्णालयात नेले. मात्र वाटेतच त्यांचा मृत्यू झाला, असे पोलिसांनी सांगितले.
चंडिली पोलिसांनी चौकशीसाठी भद्रा याला ताब्यात घेतले आणि तपास सुरू केला. पोलीस मृत्यूच्या कारणांचा तपास करत आहेत. मृत्यूचे नेमके कारण शवविच्छेदन आणि फॉरेन्सिक पुराव्यांनंतरच स्पष्ट होईल, असे पोलिसांनी सांगितले. शवविच्छेदन अहवाल तसेच तपासातील निष्कर्षांच्या आधारे पुढील कारवाई केली जाईल, असेही प्रभारी निरीक्षकांनी सांगितले.




























































