भूमिअभिलेख उपअधीक्षकाने मोजणीचे २ कोटी ढापले, हेमवतीनंदन कुमावतला अटक

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मोखाडा तालुक्यातील भूमिअभिलेख कार्यालयाचे उपअधीक्षक हेमवतीनंदन कुमावत यांनी विविध मोजणीसाठी आकारण्यात येणारी रक्कम शासनाच्या तिजोरीतून थेट स्वतःच्या खात्यात वळवल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे. थोडीथोडकी नाही तर तब्बल २ कोटी १ लाख १४ हजार ६१६ एवढी मोठी रक्कम कुमावत याने स्वतःसह अन्य एका व्यक्तीच्या खात्यावर वळवली आहे. या प्रकरणाचा भंडाफोड होताच मोखाडा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली असून या प्रकरणाची गंभीर दखल घेत मोखाडा पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपी हेमवतीनंदन कुमावत याला अटक केली आहे.

मोखाड्यात उपअधीक्षक पदावर कार्यरत असताना कुमावत यांनी २०२३ ते २०२६ या काळात हा सर्व गैरव्यवहार केल्याचे समोर आले आहे. पालघर-मोखाडा रस्ता रुंदीकरणासाठी केलेल्या भूसंपादनाची फी ठाणे सार्वजनिक बांधकाम खात्याकडून घेण्यात आली होती. त्याचबरोबर नांदुरमध्यमेश्वर नदी जोड प्रकल्पासाठी भूसंपादन आणि वनदाव्यामध्ये वनपट्टे मोजणीकरिता संबंधित शासकीय कार्यालयाने धनादेशाद्वारे मोखाडा उपअधीक्षक कार्यालयाच्या बँक ऑफ बडोदा या शाखेत फी भरली होती. मात्र बँकेच्या ९८८८०१००००००७९ या खात्यातून जमा असलेली शासकीय रक्कम नियमाप्रमाणे चलनाद्वारे शासकीय लेखाशिर्ष क्र. ००२९ मध्ये जमा करणे बंधनकारक होते. शुभम पावसे याच्याही नावे रक्कम काढण्यात आली आहे.

मागील तीन वर्षांतील मोजणीची होणार चौकशी

नव्याने हजर झालेले उपअधीक्षक रवींद्र निकम यांच्या हा सर्व प्रकार लक्षात आला. या प्रकरणा बरोबरच आता कुमावत यांच्या कालावधीत झालेल्या मोजणी, खरेदी, विक्री, जमिनीच्या नोंदी या सगळ्या प्रकरणांचीदेखील चौकशी होणार आहे. एवढा मोठा अपहार करताना कार्यालयातील दुसरे कोणी अधिकारीही यात सामील आहेत का? याचादेखील तपास केला जाणार आहे.