
स्पाइसजेटच्या दिल्ली-पुणे विमानातील प्रवाशांना मंगळवारी रात्री भयंकर अनुभव आला. विमानातील एसी बंद असताना देखील विमान धावपट्टीवर नेण्यात आले. यावेळी वृद्ध व्यक्ती, गर्भवती महिला यांना प्रचंड त्रास होऊ लागला. क्रू मेंबर्सना याबद्दल माहिती देऊन देखील त्यांच्याकडून कोणताही प्रतिसाद मिळत नव्हता. अखेर सहप्रवाशांनी आवाज केल्यानंतर विमान धावपट्टीवरून पुन्हा मागे घेण्यात आले. विमान कंपनीच्या मॅनेजरशी चर्चा करूनही ते याच विमानाने प्रवास करावा लागेल असे सांगू लागले. मात्र प्रवाशांनी दुसऱ्या विमानाची मागणी केली. अखेर टेक्निकल टीमने संबंधित विमान प्रवासासाठी योग्य नसल्याचे सांगितल्यानंतर पहाटे पाच वाजता दुसऱ्या विमानाने प्रवाशांना पुण्याला पाठवण्यात आले.
याविमानाने प्रवास करणाऱ्या लेशपाल जवळगे यांनी विमान प्रवासावेळीचा थरारक प्रसंग सामनासोबत बोलताना सांगितला. विमान डिपार्चरपासून धावपट्टीवर जाऊन पुन्हा परत येईपर्यंत विमानात गॅस चेंबरसारखा भयंकर अनुभव आल्याचे लेशपाल यांनी सांगितले. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, दिल्लीतील टर्मिनल १ वरून मंगळवारी रात्री दिल्ली – पुणे हे स्पाइस जेटचे विमान नियोजित होते. प्रवासी विमानात बसल्यावर सर्वांना उकडायला लागले. एसी सुरू नाहीत हे काही प्रवाशांनी क्रू मेंबर्सना लक्षात आणून दिले. मात्र उड्डाणावेळी एसी सुरू होतील अशी माहिती दिली. प्रवासी मात्र हैराण झाले होते. तशा परिस्थितीत विमान उड्डाणासाठी धावपट्टीवर नेण्यात आले. मात्र तरी एसी सुरू झाले नाहीत. काही प्रवाशांनी क्रू मेंबर्सना एसी सुरू करण्याची विनंती केली. लहान मुले, वृद्ध व्यक्ती, गर्भवती महिलांना श्वास घेण्यास त्रास होत होता. प्रवाशांचा तणाव वाढला. कुणीच दखल घेत नाही पाहून सहप्रवाशांनी आवाज उठवला. तशाही परिस्थितीत विमानाचे कॅप्टनचा विमान उड्डाणाचा प्रयत्न होता. त्यांनी प्रवाशांना दबाव आणण्याचा प्रयत्न केला, मात्र प्रवाशांनी त्यास विरोध केला. अखेर विमान पुन्हा डिपार्चरला आणण्यात आले. त्यानंतर श्वास घेण्यासाठी ज्यांना त्रास होत आहे अशा प्रवाशांना, गर्भवती महिलांना प्रथम उतरवण्यात आले. मात्र तिथे कोणतीही वैद्यकीय उपचार सुविधा अथवा अॅम्ब्युलन्स नव्हती. प्रवाशांनीच एकमेकांना मदत केली. प्रवशांनी विमान बदलून देण्याची किंवा तिकिटाचे पैसे परत करण्याची मागणी केली मात्र मॅनेजर ऐकण्यास तयार नव्हते. त्यानंतर प्रवाशांनी आहे तिथेचे ठिय्या दिला आणि घोषणाबाजी सुरू केली. प्रवाशांचा आवाज दाबण्यासाठी म्हणून विमानतळ सुरक्षा विभागातील जवानांना बोलवण्यात आले. मात्र तरी प्रवासी ऐकले नाहीत. अखेर एका टेक्निकल टीमला बोलवून विमानाची तपासणी करण्यात आली. त्या टीमने विमान उड्डाणाच्या स्थितीत नसल्याचे सांगितल्यानंतर वेगळ्या विमानाची व्यवस्था करण्यात आली. अखेर अरेरावी करणाऱ्या संबंधित मॅनेजरने प्रवाशांची माफी मागितली आणि पहाटे पाच वाजता नवीन विमान प्रवाशांना उपलब्ध करून दिले, अशी माहिती लेशपाल जवळगे यांनी दिली.
‘यामध्ये केंद्रीय नागरी विमान वाहतूक मंत्रालयाने गांभीर्याने लक्ष देऊन या स्पाईस जेट कंपनीवर कठोर कारवाई करण्याची गरज आहे’, अशी मागणी देखील लेशपाल जवळगे यांनी यावेळी केली.



























































