
नागपंचमी म्हटली की पूजेसोबतच आठवते ती आजी-आईच्या हाताची पारंपरिक चव… म्हणजेच गरमागरम आणि साजूक तुपाची धार असलेले उकडलेले पुरणाचे दिंड. लहानांपासून थोरांपर्यंत सर्वांच्याच तोंडाला पाणी सोडणारी अस्सल महाराष्ट्रीयन मेजवानी आज आपण बनवणार आहोत.
साहित्य –
चणा डाळ – १ कप
गूळ (बारीक चिरलेला) – १ कप
वेलची-जायफळ पूड – १ चमचा
गव्हाचे पीठ – २ कप
साजूक तूप – २ चमचे (मोहनसाठी)
मीठ – चिमूटभर
पाणी
दूध
पुरण तयार करण्याची कृती –
- चणा डाळ धुऊन कुकरमध्ये ३ ते ४ शिट्ट्या काढून मऊ शिजवून घ्या.
- शिजलेल्या डाळीतील अतिरिक्त पाणी (कटाच्या आमटीसाठी) काढून टाका.
- कढईत शिजलेली डाळ आणि गूळ एकत्र करून मंद आचेवर शिजवा. मिश्रण घट्ट होईपर्यंत सतत परतत राहा.
- मिश्रण घट्ट झाल्यावर त्यात वेलची-जायफळ पूड टाका आणि पुरणयंत्रातून किंवा मिक्सरमधून बारीक वाटून घ्या.
पीठ भिजवणे –
गव्हाच्या पिठात मीठ आणि २ चमचे गरम साजूक तूप घालून एकत्र करा.
थोडे थोडे पाणी घालून पोळीच्या पिठापेक्षा थोडे घट्ट पीठ भिजवून घ्या आणि १०-१५ मिनिटे झाकून ठेवा.
दिंड वळणे –
भिजवलेल्या पिठाचा लिंबाएवढा गोळा घेऊन त्याची मध्यम जाडीची चौकोनी किंवा गोल पोळी लाटा.
पोळीच्या मध्यभागी २ ते ३ चमचे पुरणाचा गोळा किंवा सारण ठेवा.
पोळीच्या चारही बाजू एकमेकांवर मोदकासारख्या किंवा पाकिटासारख्या (चौकोनी घडी घालून) बंद करा, जेणेकरून पुरण बाहेर येणार नाही.
उकडणे –
- मोदकाच्या पात्रात किंवा चाळणीला थोडे तेल लावून त्यात हे दिंड ठेवा.
- उकळत्या पाण्यात चाळणी ठेवून झाकण लावा आणि मध्यम आचेवर १५ ते २० मिनिटे वाफवून घ्या.
- गरमागरम उकडलेले पुरणाचे दिंड त्यावर साजूक तुपाची धार, केशर टाकून दुधासोबत खायला द्या.

























































