राम मंदिर ते महाकुंभ घोटाळा… ED च्या कारवाईवर अखिलेश यादव भडकले; भाजपच्या भ्रष्टाचाराची यादी केली जाहीर

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

अंमलबजावणी संचालनालय (ED) अॅक्शन मोडवर असून वेगवेगळ्या ठिकाणी कारवाई सुरू आहे. रामपूर, सहारनपुर आणि दिल्लीसह १० वेगवेगळ्या ठिकाणी ईडीने छापेमारी केली. यावरून राजकारण तापले असून समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांनी सरकावर हल्लाबोल केला आहे. अखिलेश यांनी थेट भाजप राजवटीतील कथित भ्रष्टाचाराची एक यादी जाहीर केली असून कारवाईची मागणी केली आहे. सपा नेते आजम खान यांच्या 10 ठिकाणांवर बुधवारी ईडीने छापेमारी केली आहे. यावरूनच अखिलेश यादव यांनी सरकारला घेरले आहे.

अखिलेश यादव यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर यासंदर्भात एक पोस्ट शेअर केली आहे. शिक्षण, शिक्षक आणि विद्यार्थ्यांचे विरोधक असणारे तसेच शाळा बंद पाडणारे भाजप आणि त्यांचे सहकारी, युनिव्हर्सिटी बनवणाऱ्यांच्या विरोधात ईडीची छापेमारी करत आहेत. या माध्यमातून ते त्यांच्या 1/2 टक्के उरलेल्या जातीयवादी आणि संकुचित विचारसरणीच्या समर्थकांना खूश करत आहेत. मात्र, जे लोक गुन्हेगारी कृत्यांमध्ये सामील आहेत, त्या भ्रष्टाचाऱ्यांवर कोणतीही कारवाई केली जात नसल्याचे अखिलेश यादव म्हणाले.

अखिलेश यादव यांनी जाहीर केली भ्रष्टाचाराची यादी –
– राम मंदिराशी संबंधित प्रकरणांमधील आरोपी
– सत्तेतील सजातीय गुन्हेगार
– कोडीन घोटाळ्याशी संबंधित प्रकरणे
– भाजप निर्मित खराब बुंदेलखंड एक्सप्रेसवे
– भाजप निर्मित खड्ड्यांनी भरलेला पूर्वांचल एक्सप्रेसवे
– भाजपनिर्मित कानपुर-लखनऊ एक्सप्रेसवे
– भाजप राजवटीतील निकृष्ट दर्जाचे रस्ते आणि पूल
– भाजपचे भ्रष्ट पोलीस अधिकारी
– कोसळणाऱ्या पाण्याच्या टाक्या आणि गळणाऱ्या छतांचे प्रकल्प
– स्मार्ट सिटीच्या नावावर झालेला कोट्यवधींचा भ्रष्टाचार
– महाकुंभ घोटाळ्याशी संबंधित ठेकेदार
– इतर गैरव्यवहार आणि अधिकाऱ्यांचे कथित भ्रष्टाचार

अशा अनेक भ्रष्टाचारी कामांची माहिती अखिवेश यादव यांनी सोशल मीडियावर शेअर करत सरकारच्या भ्रष्ट कारभारावर निशाणा साधला.

ईडीची मनी लाँड्रिंगप्रकरणी मोठी कारवाई

समाजवादी पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री आझम खान यांच्या अडचणी वाढल्या आहेत. ईडीने बुधवारी पहाटे आझम खान आणि त्यांच्या साथीदारांशी संबंधित 10 ठिकाणी एकाच वेळी छापेमारी केली. मनी लाँड्रिंग प्रतिबंधक कायद्याअंतर्गत (PMLA) ईडीकडून ही छापेमारी करण्यात आली आहे. तपास यंत्रणेकडून आझम खान यांचे आर्थिक व्यवहार, कथित आर्थिक अनियमितता आणि संशयास्पद निधीपुरवठ्याशी संबंधित बाबींची चौकशी केली जात आहे.

ईडीची आझम खान यांच्याविरोधात मोठी कारवाई; दिल्लीसह 10 ठिकाणी छापेमारी