उद्या वांद्र्यात तिरंगा आंदोलन! मैदाने आणि मोकळे भूखंड वाचवण्यासाठी भाजपला दाखवणार रेड कार्ड

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मुंबईतील मैदाने आणि मोकळे भूखंड वाचवण्यासाठी रविवारी वांद्रे येथे तिरंगा आंदोलनाची हाक शिवसेना नेते, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी दिली आहे. वांद्र्याच्या रंगशारदा येथील नेव्हील डिसोझा फुटबॉल ग्राऊंड येथे होणाऱ्या या आंदोलनाच्या माध्यमातून भाजपला रेड कार्ड दाखवले जाणार आहे. तमाम मुंबईकर, क्रीडाप्रेमी, क्रीडा संस्था, स्वयंसेवी संस्था आणि मुंबईप्रेमींनी या आंदोलनात सहभागी व्हावे, असे आवाहन आदित्य ठाकरे यांनी केले आहे.

अंधेरीचे शहाजी राजे भोसले क्रीडा संकुल मैदान, जुहूमधील दोन मोकळे भूखंड यासह नेव्हील डिसोझा फुटबॉल ग्राऊंडची जागा महायुती सरकार महानगरपालिकेच्या माध्यमातून त्यांच्या लाडक्या कंत्राटदारांच्या आणि भाजप आमदारांच्या घशात घालत आहे. शिवसेनेने त्याला तीव्र विरोध केला आहे. मुंबईतील मैदाने आणि मोकळे भूखंड मुंबईकरांसाठी आहेत, ते बिल्डर-कंत्राटदारांच्या घशात घालू देणार नाही, असा इशारा आदित्य ठाकरे यांनी दिला आहे.

कोणत्याही पक्षाचा झेंडा नसेल!

या आंदोलनात मुंबईकरांसह सर्व राजकीय पक्षांनी आपले झेंडे बाजूला ठेवून, पक्ष, जातपात, धर्म, पंथ, विचारधारा बाजूला ठेवून सहभागी व्हावे. आंदोलनात कोणत्याही पक्षाचा झेंडा नसेल, केवळ तिरंगा झेंडा असेल असे आदित्य ठाकरे यांनी सोशल मीडियावर केलेल्या पोस्टमध्ये नमूद केले आहे.

स्थळ ः नेव्हील डिसोझा फुटबॉल मैदान

वेळ ः सायंकाळी 5 वाजता