
वीरमाता जिजाबाई तंत्रज्ञान संस्थेमधील पायाभूत सुविधांची आता वरिष्ठ पातळीवर चौकशी होणार आहे. याबाबत शिवसेना नेते, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या निर्देशानुसार युवासेनेने केलेल्या पाठपुराव्यानंतर आता उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांनी ‘व्हीजेटीआय’मधील गैरसुविधांची चौकशी करण्याचे आदेश संचालकांना दिले आहेत.
व्हीजेटीआयच्या वसतिगृहातील पायाभूत सुविधांचा सद्यस्थितीत बोजवारा उडाला आहे. दोन्ही वसतिगृह इमारतींतील बाथरूम व्यवस्था, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, आंघोळीकरिता गरम पाण्याची व्यवस्था कोलमडून पडली आहे. युवासेनेने वसतिगृहावर धडक देत या दुरवस्थेची पोलखोल केली होती. यावेळी स्थानिक नगरसेविका माधुरी मांजरेकर, शाखाप्रमुख राकेश कांबळे, युवासेना विभाग अधिकारी स्वप्नील सूर्यवंशी, सिनेट सदस्य प्रदीप सावंत, परम यादव, मयूर पांचाळ आणि माजी सिनेट सदस्य राजन कोळंबेकर उपस्थित होते. याची दखल उच्च व तंत्र शिक्षणमंत्र्यांनी घेत ‘विद्यार्थ्यांना वाजवी शुल्कात दर्जेदार शिक्षण आणि उत्तम सुविधा मिळाल्या पाहिजेत. यासाठी शासन स्तरावर आवश्यक ते सर्व प्रकारचे सहकार्य केले जाईल,’ असे आश्वासन युवासेनेला दिले आहे.




























































