विद्यार्थ्यांची गैरसोय दूर करा! शिवसेनेची व्हीजेटीआय महाविद्यालयावर धडक

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

माटुंगा येथील वीरमाता जिजाबाई तंत्रज्ञान संस्था (व्हीजेटीआय) महाविद्यालयात शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांच्या वसतिगृहाची दुरवस्था झाली असून तेथील स्वच्छतागृहांचीदेखील दयनीय अवस्था झाली आहे. ही बाब लक्षात येताच शिवसेनेने महाविद्यालयावर धडक देत प्रशासनाला धारेवर धरले. विद्यार्थ्यांची गैरसोय तातडीने दूर करा, अशी तंबी यावेळी शिवसेनेने महाविद्यालय प्रशासनाकडे दिली.

शिवसेना नेते, खासदार अनिल देसाई यांनी मतदारसंघातील सर्व महाविद्यालयांना भेट देऊन विद्यार्थी, शिक्षक–शिक्षकेतर कर्मचारी, महाविद्यालय प्रशासन यांच्या समस्या जाणून घेण्यासाठी पाहणी दौरा केला. दरम्यान व्हीजेटीआय महाविद्यालयातील विद्यार्थ्यांची होणारी गैरसोय लक्षात घेत देसाई यांनी संचालक डॉ. सचिन कोरे, वसतिगृहाचे डॉ. अभय बांबोले यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी वसतिगृहाची दुरवस्था, अस्वच्छ स्वच्छतागृहे, विद्यार्थ्यांची वर्गातील सुरक्षा, शिक्षक भरती, महाविद्यालयाचे मानांकन उंचवण्यासाठी आवश्यक बाबी या विषयांवर सविस्तर चर्चा करत जाब विचारला. यावेळी नगरसेविका माधुरी मांजरेकर, युवासेना सिनेट सदस्य प्रदीप सावंत, मयूर पांचाळ, माजी सिनेट सदस्य राजन कोळंबेकर, विमा कर्मचारी सेनेचे सरचिटणीस दिनेश बोभाटे, राकेश देशमुख, राजेश कांबळे आदी उपस्थित होते.