
भाजपचे आमदार नरेंद्र मेहता यांच्या सेव्हन इलेव्हन कन्स्ट्रक्शन कंपनीने ८१ वर्षीय ज्येष्ठ नागरिक असगर अली वोरा यांची जमीन काही वर्षांपूर्वी घेतली होती. या भूखंडाबाबत वाद निर्माण झाला. वारंवार मागणी करूनही मेहता यांनी वोरा यांना आपली जमीन परत केली नाही. अखेर त्यांनी आपल्या शाळेतील मित्र व देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची थेट दिल्लीत जाऊन भेट घेतली आणि मदतीची विनंती केली.
मोदी यांनी हे प्रकरण समजून घेतल्यानंतर डोळे वटारताच नरेंद्र मेहता सुतासारखे सरळ झाले. त्यांनी तातडीने वोरा यांच्या भूखंडाचा ताबा सोडला असून बांधकाम परवानगीही परत केली आहे. तसेच त्यांच्याविरुद्ध पोलीस ठाण्यात केलेली तक्रारदेखील मागे घेण्याचा निर्णय मेहता यांनी जाहीर केला. मीरा-भाईंदर महापालिका क्षेत्रात असलेल्या नवघर येथील काही जमीन असगर अली वोरा यांनी खरेदी केली होती. त्या जमिनीवर काही जणांनी परवानगीशिवाय बांधकाम केले होते. त्यांनी यासंदर्भात पोलीस ठाण्यात तक्रारही केली होती. पण त्याकडे फारसे लक्ष देण्यात आले नाही. आपली हक्काची जमीन परत मिळावी यासाठी ज्येष्ठ नागरिक वोरा यांनी अनेकदा पत्रव्यवहार केला, पण त्याची दखल घेण्यात आली नाही.
वडनगरच्या शाळेत एकत्र
वोरा व पंतप्रधान नरेंद्र मोदी हे गुजरातच्या वडनगर येथील बी. एन. स्कूलमध्ये एकत्र शिकले आहेत. आपली जमीन पुन्हा मिळवण्यासाठी केलेले प्रयत्न यशस्वी न झाल्याने अखेर त्यांना आपले मित्र मोदी यांची आठवण आली. त्यांनी थेट दिल्लीत जाऊन त्यांची भेट घेतली आणि आपल्यावरील अन्यायाबाबतची माहिती दिली. पंतप्रधानांनी लगेच वगमित्रासाठी नरेंद्र मेहता यांच्यावर डोळे वटारले. आश्चर्य म्हणजे तातडीने यंत्रणा हलली आणि मेहता यांनी लगेच वोरा यांची जमीन परत करणार असल्याचे स्पष्ट केले.





























































