टाटा समुहात पुन्हा वाद, चंद्रशेखरन यांच्या फेरनियुक्तीला नोएल टाटा यांचा विरोध

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

टाटा सन्सच्या कार्यकारी अध्यक्षपदी एन. चंद्रशेखरन यांची फेरनियुक्ती करण्यात आली आहे. टाटा सन्सच्या संचालक मंडळाने आज या संदर्भातील ठराव मंजूर केला. मात्र या निर्णयास टाटा ट्रस्टचे अध्यक्ष नोएल टाटा यांनी विरोध केला आहे. ही नियुक्ती बेकायदा असल्याचे त्यांनी म्हटले आहे. त्यामुळे देशातील सर्वात मोठय़ा उद्योग समूहातील मतभेद पुन्हा चव्हाट्यावर आले आहेत.

एन. चंद्रशेखरन हे फेब्रुवारी 2027 मध्ये निवृत्त होणार होते. मात्र त्याआधीच 12 ऑगस्ट 2026 रोजी त्यांनी पदाचा राजीनामा दिला होता. नोएल टाटा यांच्याशी मतभेद आणि ट्रस्टमधील अंतर्गत संघर्ष हेच त्यांच्या राजीनाम्यामागील कारण असल्याचे तेव्हा सांगितले जात होते. चंद्रशेखरन यांनी पुन्हा संचालक मंडळावर येणार नसल्याचे जाहीर केल्याने त्यांच्या जागी नव्या व्यक्तीचा शोध सुरू झाला होता. मात्र, आज अचानक त्यांना 5 वर्षांसाठी मुदतवाढ देण्यात आली. टाटा सन्सच्या बोर्डातील चार सदस्यांनी चंद्रशेखरन यांच्या बाजूने मतदान केले तर, नोएल टाटा यांनी विरोधात मतदान केले.

टाटा सन्सच्या एजीएमकडे लक्ष

टाटा सन्सच्या बोर्डात एन. चंद्रशेखरन, नोएल टाटा, वेणू श्रीनिवासन, सौरभ अग्रवाल, हरीश मनवानी आणि अनिता मारंगोली जॉर्ज यांचा समावेश आहे. टाटा सन्सची वार्षिक सर्वसाधारण सभा 31 डिसेंबरपर्यंत होणार आहे. या सभेत चंद्रशेखरन यांना हटवण्याचा प्रस्ताव आणला जाण्याची शक्यता आहे. टाटा ट्रस्ट्सकडे टाटा सन्सची 66 टक्के भागीदारी आहे. त्यामुळे नोएल यांच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.