
<< स्पायडरमॅन
सेल्फ-ड्रायव्हिंग कारने अचानक ब्रेक का मारला, ती कुठे वळली किंवा एखाद्या वस्तूपासून दूर का राहिली, हे आता माणसाला समजणे सोपे होणार आहे. अमेरिकेतील एमआयटी आणि स्वयंचलित वाहन तंत्रज्ञान कंपनी मोशनलच्या संशोधकांनी कारच्या कृत्रिम बुद्धिमत्तेने घेतलेले निर्णय सोप्या भाषेत समजावून सांगणारी नवी प्रणाली विकसित केली आहे. ‘कन्सेप्ट-रॅपर नेटवर्क’ अर्थात सीडब्ल्यू-नेट असे तिचे नाव आहे. सेल्फ-ड्रायव्हिंग कार कॅमेरे आणि लिडार सेन्सरच्या मदतीने आजूबाजूची माहिती गोळा करते. त्यानंतर तिची एआय प्रणाली पुढे काय करायचे ते ठरवते. मात्र हा निर्णय नेमका कसा घेतला, हे माणसाला अनेकदा समजत नाही. सीडब्ल्यू-नेट ही अडचण दूर करण्याचा प्रयत्न करते. कारच्या निर्णयामागची माहिती ‘समोर थांबलेले वाहन’ किंवा ‘जवळ सायकलस्वार’ अशा सहज समजणाऱ्या संकल्पनांमध्ये दाखवली जाते.
संशोधकांनी या प्रणालीला तब्बल 13 कोटी वाहनांच्या प्रवासातील वेगवेगळ्या प्रसंगांची माहिती देऊन शिकवले. त्यानंतर केलेल्या चाचण्यांमध्ये सुरक्षा चालकांना कार पुढे काय करणार आहे, याचा अंदाज अधिक अचूकपणे घेता आला. एका प्रसंगात कार एका सायकलस्वाराजवळ थांबली. चालकाला वाटले की कारने सायकलस्वाराला पाहिले म्हणून ती थांबली. मात्र प्रणालीने वेगळे कारण दाखवले. कारला सायकलस्वाराचा योग्य अंदाज आला नव्हता; जवळ गेल्यानंतर धोका लक्षात आल्याने तिने आपत्कालीन ब्रेक लावला होता.
यामुळे चालकाला अशा प्रसंगी आधीच वेग कमी करता येऊ शकतो किंवा गरज पडल्यास कार स्वतः चालवण्याची पद्धत बंद करता येऊ शकते. अभियंत्यांनाही कारच्या एआयमधील चुका शोधून त्यात सुधारणा करता येतील. या तंत्रज्ञानामुळे सेल्फ-ड्रायव्हिंग कार अधिक पारदर्शक आणि सुरक्षित होण्यास मदत होऊ शकते. कार काय करते याइतकेच ती असे का करते, हे समजणेही भविष्यात महत्त्वाचे ठरणार आहे. विशेषतः आपत्कालीन प्रसंगी मानवी हस्तक्षेप अधिक वेगाने करता येईल.

























































