
विनायक चतुर्थीनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या अन्नदान कार्यक्रमादरम्यान मोठी दुर्घटना घडली. उकळत्या सांबारच्या मोठ्या भांड्यात पडून 46 वर्षीय महिलेचा मृत्यू झाला. सुजाता असे मयत महिलेचे नाव आहे. या घटनेमुळे उत्सवावर शोककळा पसरली आहे. सुजाता यांच्या मृत्यूमुळे ऐन सणासुदीच्या काळात कुटुंबावर शोककळा पसरली आहे.
एनडीटीव्हीने दिलेल्या वृत्तानुसार, आंध्र प्रदेशातील विजयवाडा येथे रविवारी सकाळी विनायक चतुर्थीनिमित्त अन्नदान कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमासाठी सुजाता या स्वयंपाकाच्या कामात मदत करत होत्या. यादरम्यान त्या चुकून उकळत्या सांबारच्या भांड्यात पडल्या. यात त्या गंभीर भाजल्या.
गंभीर जखमी अवस्थेत त्यांना तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र सोमवारी सकाळी उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. पोलिसांनी या घटनेचा तपास सुरू केला आहे. त्या महिला भांड्यात कशा पडल्या आणि हा अपघात नेमका कसा घडला? याबाबत पोलीस सखोल तपास करत आहेत.

























































