
इटालियन प्रवाशांनी अनिवार्य निर्गमन इमिग्रेशन प्रक्रिया टाळल्याप्रकरणी एअर इंडियाच्या कर्मचाऱ्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. इमिग्रेशन प्रक्रिया पूर्ण न करता या प्रवाशांना दिल्ली म्युनिक विमानात चढण्याची परवानगी देण्यात आली. याप्रकरणी एअर इंडियाच्या कर्मचाऱ्यावर कारवाई करण्यात आली.
एनडीटीव्हीने दिलेल्या वृत्तानुसार, प्रवाशांना विमानतळावरील निर्धारित मार्गांवरून नेण्यासाठी नेमलेल्या एअर इंडियाच्या कर्मचाऱ्याने विहित कार्यपद्धतीचे पालन केले नाही, असे तपासात आढळून आले.
या घटनेमुळे कनेक्टिंग आंतरराष्ट्रीय विमानाने प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठीच्या कार्यप्रणाली आणि सुरक्षा प्रक्रियेचा सविस्तर आढावा घेतला जात आहे. नागरी उड्डाण मंत्रालयाने एअर इंडियासोबतच्या संपूर्ण प्रवासाचा आढावा घेतला. यामध्ये बोर्डिंग-पास जारी करणे, प्रवाशांचे मार्ग निश्चित करणे, कनेक्टिंग विमानतळावर प्रवाशांचे विलगीकरण आणि हालचाल, तसेच डिजीयात्राच्या भूमिकेचा समावेश आहे.

























































