
संत्री चविष्ट आणि रसाळ फळांपैकी एक आहे. मात्र, योग्य पद्धतीने साठवणूक न केल्यास लवकर कोरडी पडतात किंवा त्यावर बुरशी येऊ शकते. अनेक जण एकाच वेळी भरपूर संत्री खरेदी करून ते घरात ठेवतात. पण काही दिवसांनंतर त्यांचा ताजेपणा आणि रस कमी होऊ लागतो.
संत्री अधिक काळ ताजी आणि चांगल्या स्थितीत ठेवण्यासाठी काही सोप्या गोष्टी लक्षात घेणे आवश्यक आहे.
संत्री दीर्घकाळ ताजे ठेवण्यासाठी फ्रिजमध्ये साठवणे हा एक चांगला पर्याय आहे. कमी तापमानामुळे फळातील ओलावा टिकून राहण्यास मदत होते.
फ्रिजमध्ये योग्य पद्धतीने ठेवल्यास संत्री साधारण दोन ते तीन आठवडे ताजे राहू शकतात. फ्रिजच्या क्रिस्पर ड्रॉवरमध्ये ते ठेवणे अधिक फायदेशीर ठरते.
संत्री खरेदी केल्यानंतर लगेच धुऊन ठेवणे टाळावे. सालीवर पाणी राहिल्यास ओलावा वाढतो आणि बुरशी लागण्याची शक्यता निर्माण होते.
संत्री खाण्यापूर्वीच धुवावीत. साठवताना ती कोरडी असणे महत्त्वाचे आहे.
संत्री पूर्णपणे बंद प्लास्टिकच्या पिशवीत ठेवू नयेत. अशा पिशव्यांमध्ये ओलावा साचल्यामुळे फळे लवकर खराब होऊ शकतात.
जाळीदार पिशवी, कापडी पिशवी किंवा हवा खेळती राहील अशा पिशवीत संत्री ठेवावीत. यामुळे सालीवर ओलावा जमा होण्याचे प्रमाण कमी होते.
संत्री आसपासच्या पदार्थांचा वास शोषून घेऊ शकतात. कांदा, लसूण किंवा तीव्र वास असलेल्या पदार्थांच्या जवळ संत्री ठेवल्यास त्यांच्या चव आणि सुगंधावर परिणाम होऊ शकतो. त्यामुळे संत्री वेगळ्या जागी साठवणे अधिक योग्य ठरते.
साठवलेल्या संत्र्यांची नियमित तपासणी करावी. एखादे संत्रे खूप मऊ झाले असेल, त्यावर डाग किंवा बुरशी दिसत असेल, तर ते लगेच वेगळे काढावे. एक खराब झालेले फळ इतर फळांनाही खराब करू शकते. त्यामुळे वेळोवेळी तपासणी करणे आवश्यक आहे. संत्री एखाद्या भांड्यात किंवा कंटेनरमध्ये ठेवत असल्यास तळाशी कोरडा पेपर टॉवेल ठेवता येतो. तो अतिरिक्त ओलावा शोषून घेतो.
पेपर टॉवेल ओला झाल्यास तो बदलावा. यामुळे फळांच्या आसपासचा ओलावा कमी ठेवण्यास मदत होते.
थंड आणि सावलीच्या ठिकाणी ठेवा
फ्रिजमध्ये संत्री ठेवायचे नसल्यास घरातील थंड आणि कोरडी जागा निवडावी. थेट सूर्यप्रकाश, गॅस किंवा ओव्हनजवळ संत्रे ठेवू नयेत.
सामान्य तापमानात संत्रे साधारण एक आठवडा टिकू शकतात. मात्र, तापमान आणि फळांचा ताजेपणा यानुसार हा कालावधी बदलू शकतो.
केळी आणि सफरचंद यांसारखी फळे एथिलीन वायू सोडतात. हा वायू फळे पिकण्याची प्रक्रिया वेगवान करतो. त्यामुळे संतरे या फळांच्या जवळ ठेवल्यास ते लवकर मऊ पडण्याची शक्यता असते.



























































