ठसा – संजय गुप्ता

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

 

नव्वदच्या दशकात चकाचक आणि सत्तर एमएमचा गुन्हेगारी विदेशी चित्रपट हाच आपला आदर्श मानत हिंदी चित्रपटसृष्टीत ज्यांनी दिग्दर्शक म्हणून वाटचाल केली त्यातील एक दिग्दर्शक संजय गुप्ता. एव्हाना विदेशी चित्रपटांच्या चित्रफिती आपल्या देशात उपलब्ध होत होत्या आणि उपग्रह वाहिन्यांचेही आगमन झाले होते. तरीदेखील आपल्या चित्रपटाची मध्य् ावर्ती कल्पना एकतर विदेशी पठडीतील असावी, आपल्या शहरातील गोष्ट असली तरी त्याचं सादरीकरण, तांत्रिक मूल्ये विदेशी चित्रपटाच्या दर्जाची असावी याकडे संजय गुप्तांचा जास्त भर. तीच त्याची ओळख बनली आणि त्यातही विशेष म्हणजे त्यांची संजय दत्तशी चांगली जोडी जमली.

विशेष म्हणजे निर्माते जी. पी. सिप्पी यांनी संजय गुप्ता यांना दिग्दर्शनात पदार्पण करण्याची पहिली संधी दिली आणि त्यानंतरही सिप्पी फिल्मच्या काही चित्रपटांचे दिग्दर्शन केले. संजय गुप्ता दिग्दर्शित पहिला चित्रपट सिप्पी फिल्मच्या ‘आतिश’ मध्ये (1994) आधुनिक शस्त्रांनी मारधाड अॅक्शन दृश्यात लक्षवेधक ठरला. पोस्टरपासूनच गुन्हेगारीशी नातं. खरं तर या चित्रपटाची मध्यवर्ती कल्पना सलीम-जावेद लिखित आणि यश चोप्रा दिग्दर्शित  ‘दीवार’वर (1975) आधारित आहे आणि जोडीला जॉन ह्यू यांच्या ‘अ बेटर टुमारो’ या विदेशी चित्रपटाची कथाकल्पना घेतली, पण सगळं गणित फसलं.

धड ना हिंदी चित्रपट ना विदेशी असे कडबोळे झाले आणि चित्रपट अपयशी ठरला. यानंतर या जोडीने ‘काँटे’, ‘मुसाफिर’, ‘जिंदा’, ‘खौफ’, ‘जंग’ या चित्रपटांत दिग्दर्शक आणि नायक अशी एकत्र कामगिरी केली. संजय दत्तची भूमिका असलेल्या प्लॅन ( दिग्दर्शक हृदय शेट्टी) आणि ‘शूटआऊट अॅट लोखंडवाला’ ( दिग्दर्शक अपूर्व लखिया) या चित्रपटांचे लेखन संजय गुप्तांचे आहे. कधी अमेरिकन अॅक्शनपॅक्ड चित्रपटावर आधारित, तर कधी दक्षिण कोरियन चित्रपटावर आधारित चित्रपट हे सूत्र त्यांनी लेखन आणि दिग्दर्शनात  कायम ठेवले आणि एकदा आपली भूमिका स्पष्ट आहे हे लक्षात घेऊन त्यांनी कारकीर्द घडवली.

‘हमेशा’ हा त्याचा चित्रपट मात्र पुनर्जन्मावर आधारित गोष्ट साकारणारा होता. संजय गुप्तांचे आणखी एक वैशिष्टय़ म्हणजे त्याने हुसेन झैदी यांच्या ‘डोंगरी टू दुबई सिक्स डिकेडस् ऑफ मुंबई माफिया’ या पुस्तकावर आधारित चित्रपट निर्मिती केली. ‘शूटआऊट अॅट लोखंडवाला’ या मुंबईतील अंडरवर्ल्डवर आधारित चित्रपटाचे लेखन त्यांनी केले आणि दिग्दर्शन अपूर्व लखिया याचे होते. याच चित्रपटाचा पुढील भाग म्हणून त्यांनी ‘शूट आऊट अॅट वडाला’ हा चित्रपट लिखित आणि दिग्दर्शित केला. मन्या सुर्वे या गँगस्टरवर आधारित हा चित्रपट आहे. त्यांनी दिग्दर्शित केलेला ‘मुंबई सागा’ हा चित्रपट याच पठडीतील. विशेष म्हणजे राकेश रोशन व्यावसायिक मनोरंजन चित्रपट दिग्दर्शनात यशस्वी वाटचाल करत असताना त्याने आपल्या फिल्म क्राफ्ट या निर्मिती संस्थेसाठी संजय गुप्तांकडे ‘काबील’ (2017) या चित्रपटाच्या दिग्दर्शनाची धुरा सोपवली. या चित्रपटाच्या निमित्ताने संजय गुप्तांच्या भेटीचा योग आला असता ते आपल्या कलापृतीबद्दल विलक्षण ठाम भूमिका असलेले, तांत्रिकदृष्टय़ा सक्षम असावे अशा दृष्टिकोनाचे आणि आपल्या चित्रपटांतील हिंसाचार विषयाची गरज असते आणि त्यावर आपण भरपूर मेहनत घेतो हे स्पष्टपणे सांगणारे होते. बहुतेक याच गुणांमुळे ते अतिशय सातत्याने चित्रपट दिग्दर्शनात कार्यरत राहिले. अनेकदा यशस्वी ठरले, तर कधी त्यांनी पटकथा लेखनात भर दिला.

संजय गुप्ता आणि संजय दत्त या जोडीने ‘अलिबाग’ या नावाचा चित्रपट घोषित केला होता, पण ती केवळ घोषणा राहिली. आताही संजय गुप्ता ‘काँटे 2’ या चित्रपटाच्या निर्मिती आणि दिग्दर्शनाच्या तयारीत होता. चित्रपटसृष्टीतील आघाडीच्या अनेक कलाकारांनी संजय गुप्तांच्या चित्रपटांत भूमिका साकारली हेदेखील त्यांचे एक यशच. एखादे पाश्चात्त्य संस्पृतीचे आयटम साँग्ज हेदेखील त्यांचे वैशिष्टय़ होते!

दिलीप ठापूर

[email protected]