पुण्यात भेसळखोरांना ‘एफडीए’चा दणका, दोन हजार किलो तुपासह लाडू, बर्फी, मावा, दुग्धजन्य पदार्थांचा साठा जप्त

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

दिवाळीच्या सणात मिठाई खरेदीसाठी नागरिकांची झुंबड उडत असतानाच निकृष्ट दर्जाची मिठाई, तूप आणि खाद्यपदार्थांची विक्री सुरू असल्याचे समोर आले आहे. पुणे आणि पिंपरी-चिंचवडमध्ये अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) धडक कारवाई करत लाडू, बर्फी, मावा, तूप, काजू आणि दुग्धजन्य पदार्थांचा मोठा साठा जप्त केला. गणेश पेठेतील दोन आस्थापनांमधून तब्बल दोन हजार किलोहून अधिक तूप जप्त करण्यात आले. बाणेरपासून बाणवडीपर्यंत विविध भागांतील मिठाई विक्रेत्यांवरही कारवाई करण्यात आली.

‘सेफ फूड, सेफ महाराष्ट्र’ मोहिमेंतर्गत एफडीएने पुणे विभागातील पुणे, पिंपरी-चिंचवड, सातारा, सांगली, कोल्हापूर आणि सोलापूर येथे २५ आस्थापनांची तपासणी केली. या कारवाईतून २ हजार ३५९ किलो खाद्यपदार्थ आणि तुपाचा साठा जप्त करण्यात आला. त्याची अंदाजे किंमत ३४ लाख १७ हजार ७०० रुपये आहे. यातील ६४३ किलो खाद्यपदार्थ जागेवरच नष्ट करण्यात आले. तसेच १२ आस्थापनांचे अन्न व्यवसाय परवाने तात्काळ निलंबित करण्यात आले.

पुण्यातील गणेश पेठेत मे. न्यू गायत्री ट्रेडर्स येथून ३४३ किलो, तर मे. कुंदन डेअरी डिस्ट्रिब्युटर्स येथून एक हजार ५९६ किलो गायीचे व देशी तूप जप्त करण्यात आले. न्यू गायत्री ट्रेडर्सकडे अस्वच्छ परिस्थितीत तुपाचे पॅकिंग सुरू असल्याचे आढळले. त्यामुळे या आस्थापनाचा व्यवसाय परवाना निलंबित करण्यात आला.

बाणेरमधील ‘मे. जय गणेश लाडूवाला’ येथून ४९३ किलो मोतीचूर लाडू व बुंदी, बाणेरमधील ‘मे. मनवार स्वीट्स’ येथून ३८ किलो मोतीचूर लाडू व बुंदी, तर एरंडवणे येथील ‘मे. उत्तम स्वीट्स’मधून १७ किलो मिठाई जप्त करण्यात आली. देहूगावातील ‘मे. द्वारका स्वीट्स’ येथे ३० किलो मावा नष्ट करून व्यवसाय परवाना निलंबित करण्यात आला. तळेगाव दाभाडे येथील ‘मे. बालाजी ड्रायफ्रूट्स’मधून ३३३.५ किलो खाद्यपदार्थ जप्त करण्यात आले. त्यापैकी २५.५ किलो साठा नष्ट करण्यात आला. मोहम्मदवाडीतील ‘बिकानेर मिठाईवाले’ येथून २६८ किलो बर्फी, तर कोथरूडमधील ‘अन्नपूर्णा स्वीट्स’मधून १३३ किलोहून अधिक खाद्यपदार्थ जप्त करण्यात आले.

शिवाजीनगर गावठाणातील ‘न्यू क्वालिटी डेअरी फार्म’मधूनही दूध, दही, पनीर, क्रीम आणि तुपाचा साठा जप्त करण्यात आला. निकृष्ट दर्जा, अस्वच्छता, अयोग्य साठवणूक आणि अन्नसुरक्षा नियमांचे उल्लंघन आढळल्याने पुणे विभागातील सहा आस्थापनांमधील ६८२ किलो खाद्यपदार्थ नष्ट करण्यात आले. त्याची किंमत सुमारे एक लाख ५९ हजार ६६९ रुपये आहे. न्यू गायत्री ट्रेडर्स, द्वारका स्वीट्स, बालाजी ड्रायफ्रूट्स यांसह विविध आस्थापनांवर परवाना निलंबन आणि व्यवसाय स्थगितीची कारवाई केली.