
पेणच्या डोलवी येथील जिंदाल स्टिल वर्क्स (जेएसडब्ल्यू) कंपनीकडून शेतकऱ्यांच्या जमिनीची चोरी केली जात असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी कला आहे. जेएसडब्ल्यूने ४००/२२० केव्ही ही उच्च वीज दाब विद्युत वाहिनी टाकण्याचे काम चोरी चोरी चुपके चुपके सुरू केले असून पाटणसईतील शेतकऱ्यांना कोणत्याही नोटिसा न देता अथवा त्यांची कोणतीही परवानगी न घेता परस्पर त्यांच्या जमिनीतून हे टॉवर टाकण्याचे काम कंपनी प्रशासन आणि बीएनसी पॉवर प्रोजेक्ट लमिटेड ही ठेकेदार कंपनी करत आहे. हे हायटेन्शन टॉवर आणि वायर ज्या शेतातून नातील तेथील बळीराजा पूर्णपणे उद्ध्वस्त होणार असून याविरोधात शेतकरी प्रचंड नाक्रमक झाले आहेत. आमच्या शेतात पाऊल टाकाल तर खबरदार, असा इशारा देत नितकऱ्यांनी हायटेन्शन मनोरे उभारण्याचे कामच बंद पाडले आहे.
पाटणसई गावाच्या हद्दीतील ज्या शेतकऱ्यांच्या जागेतून ही उच्च दाबाची विद्युत वाहिनी जाणार आहे त्या जागेसह दोन्ही बाजूला सुमारे २२ ते २३ मीटर अंतरापर्यंत शेतकऱ्यांना भातशेती करता येणार नाही. जमिनीवरून जाणाऱ्या उच्च दाबाच्या वीजवाहिनीमुळे अशी जमीन भविष्यात कोणीही विकत घेणार नाही अथवा शेतकरी या जागेचा विकासही करू शकणार नाही. त्यामुळे शेतकऱ्यांच्या जमिनी कवडीमोल होणार आहेत. हा शेतकऱ्यांना भिकेला लावण्याचा डाव असल्याचा संताप शेतकऱ्यांनी व्यक्त केला.
अधिकारी आणि ठेकेदाराला धारेवर धरले
पाटणसईतील असंख्य शेतकऱ्यांनी जेएसडब्ल्यूच्या या जमीन चोरीला कडाडून विरोध केला आहे. याप्रकरणी शेतकऱ्यांनी पाटणसई येथील माजी सरपंच सदानंद गायकर यांच्या प्रांगणात उच्च दाब वीजवाहिनीच्या विरोधात बैठक घेऊन ठेकेदार बीएनसी कंपनीचे अधिकारी भरत चौगुले व देवीदास अडिवले यांना चांगलेच धारेवर धरले. कुणाच्या परवानगीने आमच्या शेतात घुसखोरी करता, शेतकऱ्यांच्या जमिनी चोरून त्यांना उद्ध्वस्त करण्याची परवानगी तुम्हाला कोणी दिली, असा संतप्त सवाल शेतकऱ्यांनी जेएसडब्ल्यूचे अधिकारी आणि ठेकेदार बीएनसी कंपनीला केला. शेतकऱ्यांच्या रुद्रावतारापुढे हे अधिकारी निरुत्तर झाले.
जोपर्यंत सक्षम अधिकाऱ्यांसोबत चर्चा होऊन शेतकऱ्यांच्या हिताचा निर्णय होत नाही तोपर्यंत काम बंद ठेवावे आणि खोदकामासाठी आणलेली जेसीबी यंत्रे हटवावीत, पाटणसईतील कोणत्याही बाधित शेतकऱ्यांवर अन्याय होऊ देणार नाही, अशी ठाम भूमिका सदानंद गायकर यांनी मांडली. या बैठकीला सुरेश गायकर, हेमंत गायकर, गजानन गायकर, संजय गायकर, गजानन दाभाडे, प्रतीक गायकर, छबीलदास कोतवाल, प्रल्हाद दाभाडे, दीपक गायकर यांच्यासह असंख्य शेतकरी उपस्थित होते.



























































