
दिवाळीच्या सणानिमित्त लागून आलेल्या सुट्टय़ांचा आनंद लुटण्यासाठी पर्यटकांनी कोकणाकडे मोठय़ा प्रमाणावर धाव घेतली आहे. निसर्गरम्य समुद्रकिनारे, ऐतिहासिक किल्ले आणि धार्मिक स्थळांमुळे रत्नागिरी जिल्हा पर्यटकांनी हाऊसफुल केला आहे. विशेषतः गणपतीपुळेला पर्यटकांची सर्वाधिक पसंती पाहायला मिळत आहे.
दिवाळीच्या सुट्टय़ांमध्ये कुटुंबीयांसह पर्यटनाचा आनंद घेण्यासाठी मुंबई, पुणे, ठाणे, कोल्हापूर तसेच पश्चिम महाराष्ट्रातील पर्यटक मोठय़ा संख्येने रत्नागिरी जिह्यात दाखल होत आहेत. रत्नागिरीपासून जवळ असलेल्या गणपतीपुळे येथे पर्यटकांची विशेष गर्दी होत आहे. श्री गणपती मंदिरात दर्शनासाठी भाविकांची रेलचेल सुरू असून मंदिर परिसर आणि समुद्रकिनारा पर्यटकांनी फुलून गेला आहे. धार्मिक पर्यटनासोबतच निसर्गसौंदर्याचा आनंद घेण्यासाठीही अनेक पर्यटक गणपतीपुळेला प्राधान्य देत आहेत. त्यामुळे जिह्यातील प्रमुख पर्यटनस्थळे पर्यटकांनी गजबजली आहेत. समुद्रकिनाऱयांवर फिरणे, समुद्राच्या लाटांचा आनंद घेणे, निसर्गरम्य परिसरात छायाचित्रे काढणे आणि स्थानिक खाद्यसंस्कृतीचा आस्वाद घेणे याकडे पर्यटकांचा कल दिसून येत आहे.
आरे-वारे समुद्रकिनारा, भाटये, मांडवी, काजीरभाटी, पावस येथील स्वामी स्वरूपानंद समाधी मंदिर, थिबा पॅलेस, जयगड किल्ला, पूर्णगड किल्ला, गुहागर, हेदवी आणि दापोली परिसरातील पर्यटन स्थळांवरही पर्यटकांची वर्दळ वाढली आहे. विशेषतः समुद्रकिनाऱयांवरील पर्यटनाला पर्यटकांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे.
पर्यटकांच्या वाढत्या संख्येमुळे हॉटेल, लॉजिंग, रिसॉर्ट, होम स्टे तसेच स्थानिक खाद्यपदार्थांच्या व्यवसायालाही चालना मिळाली आहे.
दिवाळीच्या सुट्टय़ांचा कालावधी लक्षात घेता पुढील काही दिवसही पर्यटकांची गर्दी कायम राहण्याची शक्यता आहे. कोकणातील स्वच्छ समुद्रकिनारे, शांत वातावरण आणि निसर्गसौंदर्य यामुळे यंदाच्या दिवाळीतही रत्नागिरी जिल्हा पर्यटकांसाठी आकर्षणाचे पेंद्र ठरत आहे.



























































