
ऋतू बदलू लागला की त्याचा परिणाम केवळ आरोग्यावरच नाही, तर त्वचेवरही दिसून येतो. कधी उष्ण वातावरण, तर कधी थंड व कोरडी हवा यामुळे त्वचेतील नैसर्गिक ओलावा कमी होऊ लागतो. परिणामी चेहरा कोरडा पडणे, त्वचा ताणल्यासारखी वाटणे, हात-पायांना खरखरीतपणा येणे आणि ओठ फुटणे अशा समस्या जाणवू लागतात.
त्वचेचा कोरडेपणा कमी करण्यासाठी नारळाच्या तेलाचा वापर करता येतो. आंघोळीनंतर त्वचा किंचित ओलसर असतानाच थोडे नारळाचे तेल लावल्यास त्वचेतील ओलावा टिकवून ठेवण्यास मदत होते. विशेषतः हात-पाय आणि शरीराच्या कोरड्या भागांवर याचा वापर करता येतो. मात्र, चेहऱ्यावर नारळाचे तेल लावताना त्वचेचा प्रकार लक्षात घ्यावा. मुरुमांची समस्या असणाऱ्यांनी चेहऱ्यावर तेल लावणे टाळावे.
कोरफड त्वचेला थंडावा देण्यास आणि आराम मिळवून देण्यास मदत करते. स्वच्छ, सुगंधविरहित कोरफडीचा जेल चेहरा आणि हातांवर लावता येतो. त्याचप्रमाणे मधामध्ये त्वचेतील ओलावा टिकवून ठेवण्यास मदत करणारे गुणधर्म असतात. मधाचा पातळ थर काही वेळ त्वचेवर लावून नंतर पाण्याने धुऊन काढता येतो. मात्र, कोणताही घरगुती उपाय करताना आधी त्वचेच्या छोट्या भागावर चाचणी करावी. खाज, जळजळ किंवा लालसरपणा जाणवल्यास वापर थांबवावा.
त्वचेचा ओलावा टिकवण्यासाठी आंघोळीनंतरचा वेळ महत्त्वाचा असतो. आंघोळ झाल्यानंतर त्वचा पूर्णपणे कोरडी होण्याआधी मॉइश्चरायझर किंवा क्रीम लावावे. यामुळे त्वचेतील नैसर्गिक ओलावा टिकून राहण्यास मदत होते. खूप गरम पाण्याने आंघोळ करणे टाळावे. कारण गरम पाण्यामुळे त्वचेतील नैसर्गिक तेल कमी होऊन कोरडेपणा वाढू शकतो
दिवसभर पुरेसे पाणी पिणे, आहारात फळे, हिरव्या पालेभाज्या, सुका मेवा आणि चांगल्या प्रकारचे फॅट असलेल्या पदार्थांचा समावेश करणे आवश्यक आहे. वारंवार चेहरा धुणे आणि टॉवेलने त्वचा जोरात घासणे टाळावे. ओठ कोरडे पडत असल्यास पेट्रोलियम जेलीचा वापर करावा. हात-पायांना कोरडेपणा जाणवत असल्यास रात्री झोपण्यापूर्वी मॉइश्चरायझिंग क्रीम लावावी.






























































