
सय्यद मुश्ताक अली करंडक टी-20 स्पर्धेत मुंबईने आपल्या विजयी घोडदौडीला आणखी वेग दिला. ओडिशाचा 22 धावांनी पराभव करत मुंबईने सलग पाचव्या विजयाची नोंद केली. या विजयासह 22 गुणांची कमाई करणाऱ्या मुंबईने गट ‘ड’ मध्ये अव्वल स्थानही कायम राखले. मुंबईच्या विजयात अष्टपैलू कामगिरी करणारा मुशीर ‘सामनावीर’ ठरला.
प्रथम फलंदाजी करताना मुंबईने 20 षटकांत 8 बाद 181 धावांची मजल मारली. कर्णधार सूर्यकुमार यादवने फटकेबाजी करताना अवघ्या 29 चेंडूंत 4 चौकार आणि 2 षटकारांसह 46 धावा फटकावल्या. सलामीवीर हार्दिक तामोरेने 21 चेंडूंत 32 धावांची उपयुक्त खेळी केली. मुशीर खानने 18 चेंडूंत 22, तर अखेरच्या टप्प्यात साईराज पाटीलने अवघ्या 13 चेंडूंत नाबाद 26 धावा कुटत मुंबईला भक्कम धावसंख्या उभारून दिली.
प्रत्युत्तरात ओडिशाने 182 धावांचा पाठलाग करण्याचा प्रयत्न केला, पण 20 षटकांत 9 बाद 159 धावांपर्यंतच मजल मारू शकले. स्वस्तिक सामलने 20 चेंडूंत 38, तर सुभ्रांशू सेनापतीने 31 धावांची झुंज दिली. मात्र, मुंबईच्या गोलंदाजांनी त्यांची धावगती रोखली. मुशीर खानने 27 धावांत दोन, अथर्व अंकोलेकरने 24 धावांत दोन, तर शार्दुल ठाकूरने 21 धावांत दोन विकेट टिपले.



























































