बीएआरसी, अद्विक इंटरप्रायझेस उपांत्य फेरीत दाखल

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

बीएआरसी संघाने अत्यंत एकतर्फी लढतीत ब्लॅक हॉक संघाचा 28-13 असा धुव्वा उडवत 44 व्या उपनगर जिल्हा अजिंक्यपद निवड चाचणी कबड्डी स्पर्धेच्या व्यावसायिक गटात उपांत्य फेरी गाठली. तसेच अद्विक इंटरप्रायझेसने अंतिम चार संघात स्थान मिळवले.

नगरसेवक सुनील मोरे यांच्या पुढाकाराने मुंबई उपनगर कबड्डी असोसिएशन आणि सुधीर मोरे मित्र मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित स्पर्धेत व्यावसायिक गटाच्या उपांत्यपूर्व फेरीत अद्विक इंटरप्रायझेसने मंगल मोटर्सचा 26-25 असा अवघ्या एका गुणाने पराभव केला. मध्यंतराला 17-17 अशी बरोबरी असताना रोहन शेडगे आणि प्रज्ञेश पिळणकर यांनी संयमी खेळ करत अद्विकला विजय मिळवून दिला. मंगल मोटर्सच्या अनुराग फुलारेची झुंज मात्र एकाकी ठरली. बीएआरसीनेही ब्लॅक हॉक संघाला डोके वर काढूच दिले नाही. चंद्रप्रकाश राय आणि राज पार्टे यांच्या खेळांनी बीएआरसीला 19-4 अशी विजयी आघाडी मिळवून दिल्यामुळे सामना अत्यंत एकतर्फी झाला.

महिला गटात स्वस्तिक मंडळाने निर्विघ्न स्पोर्ट्सचा 47-26 असा धुव्वा उडवला. पूर्वार्धात 15-18 अशी पिछाडी असतानाही दिशा तिरवटकर आणि पूजा मलाई यांनी उत्तरार्धात आक्रमणाचा वेग वाढवत तीन लोण चढवले आणि विजय खेचून आणला.