
मध्य रेल्वे मार्गावरील लोकलमधील ‘रेटारेटी’पासून प्रवाशांना नवीन वर्षात दिलासा मिळणार आहे. वाढत्या गर्दीचा प्रश्न सोडवण्यासाठी नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच 15 डबा लोकलच्या 25हून अधिक फेऱया वाढवण्यात येणार आहेत. त्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी) येथील प्लॅटफॉर्म विस्तारीकरण युद्धपातळीवर पूर्ण केले जात आहे. 15 डबा जलद लोकलच्या फेऱयांची संख्या 54वरून 80पर्यंत वाढवली जाणार असून याचा कसारा, आसनगाव भागातील प्रवाशांना मोठा फायदा मिळणार आहे.
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी) स्थानकावर सध्या प्लॅटफॉर्म विस्तारीकरणाचे काम युद्धपातळीवर केले जात आहे. दररोज रात्री लोकल सेवा थांबल्यानंतर दोन ते अडीच तासांच्या अवधीत हे काम करण्यात येत आहे. जलद मार्गावरील इतर स्थानकांतील प्लॅटफॉर्म विस्तारीकरण पूर्ण झाले आहे. केवळ सीएसएमटी व कसारा येथील काम पूर्ण होणे बाकी आहे.
सीएसएमटी येथील प्लॅटफॉर्म विस्तारीकरण पुढील महिनाभरात किंवा दीड महिन्यात पूर्ण होईल. त्यानंतर 15 डबा लोकलच्या 25हून अधिक फेऱयांची वाढ करण्यात येणार आहे. 12 डबा लोकल फेऱयांच्या जागी या 15 डबा लोकल फेऱयांचे समायोजन केले जाणार आहे. सद्यस्थितीत 15 डब्यांच्या 5 गाडय़ा (रेक) मध्य रेल्वेच्या प्रवाशी सेवेत धावत आहेत. याव्यतिरिक्त अलीकडेच एक नवीन रेक दाखल झाला असून आणखी एक रेक दाखल होणार आहे. या नवीन दोन गाडय़ांमुळे 15 डब्यांच्या रेकची संख्या सातवर पोहोचेल आणि सध्याच्या 15 डबा लोकलच्या नियमित फेऱयांमध्ये 54वरून 80 फेऱयांपर्यंत वाढ होईल, अशी माहिती मध्य रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली.
लोकल फेऱ्यांची एकूण संख्या ‘जैसे थे’
15 डबा लोकलचे नवीन दोन रेक दाखल झाल्यानंतर सध्याच्या 12 डबा लोकलच्या फेऱ्यांची रचना आणि वेळापत्रकात बदल केला जाईल. सध्या प्रवाशी सेवेत धावत असलेल्या 25हून अधिक 12 डबा लोकल फेऱ्यांच्या जागी 15 डबा लोकलची सेवा दिली जाईल. त्यामुळे प्रवाशी क्षमतेत मोठी वाढ होईल. मात्र लोकल फेऱ्यांची दैनंदिन एकूण संख्या ‘जैसे थे’ राहील. त्यात तूर्त कोणतीही वाढ करणे शक्य नाही, असेही एका अधिकाऱयाने स्पष्ट केले.
g मध्य रेल्वेवर सध्या 12 डबा लोकलचे प्रमाण अधिक असून या गाडीची आसन क्षमता 1175 इतकी आहे.
g 15 डबा लोकलची आसनक्षमता 1472 इतकी आहे. याव्यतिरिक्त उभे राहून प्रवास करणाऱया प्रवाशांना अधिक जागा उपलब्ध होणार आहे.





























































